Greaves Cotton या इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठ्या कंपनीने हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Ampere Zeal लाँच केली आहे. विशेष म्हणजे, ही स्कूटर खरेदी केल्यास फेम-2 योजनेअंतर्गत 18 हजार रुपयांचं अनुदान देखील मिळेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

या स्कूटरला एकदा पूर्ण चार्ज करण्यासाठी साडे पाच तासांचा वेळ लागतो आणि एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावू शकते, याशिवाय पावरफूल एक्सलरेशन असलेली ही स्कुटी 14 सेकंदात 0 ते 50 किलोमीटर प्रती तासाचा वेग घेऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या इलेक्ट्रिक स्कुटीमध्ये ड्युअल स्पीड मोड (इकॉनमी आणि पावर) आणि अॅण्टी थेफ्ट अलार्म आहे. अँटी थेफ्ट अलार्ममुळे ही स्कूटर चोरी होण्याची शक्यता कमीच आहे. पाच रंगांच्या पर्यायामध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे.

Greaves Cotton ची सहाय्यक कंपनी असलेल्या Ampere Vehicle ने या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली आहे. या कंपनीचे देशात 300 पेक्षा अधिक Greaves रिटेल स्टोर्स आणि 5 हजारपेक्षा अधिक आऊटलेट आहेत. Ampere Vehicle चे इलेक्ट्रिक व्हेहिकल्स हे तीन वर्षांच्या वॉरंटीसोबत येतात. या कंपनीच्या कमी स्पीड आणि कमी किमतीतील स्कूटरही उपलब्ध आहेत. फेम-2 योजनेअंतर्गत या स्कूटरवर 18 हजार रुपयांचं अनुदान मिळणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही स्कूटरवर भारतीयांसाठी एक परवडणारा पर्याय ठरु शकते असं कंपनीने म्हटलं आहे. अनुदानानंतर या स्कूटरची किंमत 66 हजार रुपये असणार आहे.