Fruits and vegetables for health: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या योग्यरीत्या कार्य करण्याच्या क्षमतेसाठी फळे आणि भाज्या आवश्यक आहेत. या दोन्ही नैसर्गिक वस्तू जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर व अँटिऑक्सिडंट्स या घटकांनी भरलेले असतात. मात्र, नेहमीच एक प्रश्न उपस्थित होतो- फळे जास्त आरोग्यदायी आहेत की भाज्या? या विषयावर तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
फळे आणि भाज्या शरीराला आवश्यक पोषण पुरवतात; परंतु त्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडा फरक आहे. आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी त्वरित ऊर्जा देते; तर भाज्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि फायबर, लोह, कॅल्शियम व अँटिऑक्सिडंट्स यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे भाज्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात.
फळांमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि विविध फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. संत्री, पेरू व किवीसारखी फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. सफरचंद व केळी पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तथापि, मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात फळे खावीत. कारण- फळांमधील नैसर्गिक साखर रक्तातील साखर वाढवू शकते.
भाज्यांच्या बाबतीत पाहिल्यास पालक, मेथी, ब्रोकोली, कोबी, शेंगा अशा हिरव्या भाज्या लोह आणि फायबरने समृद्ध असतात. या भाज्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात, वजन नियंत्रणात ठेवतात व बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. त्यात कॅलरीज कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा टिकविण्यासाठी भाज्यांचा आहारात नियमित समावेश करणे फायदेशीर ठरते.
भाज्यांमधील पोषक द्रव्ये दीर्घकालीन आजारांपासून बचाव करण्यात मदत करतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी दररोज तीन ते पाच वाट्या भाज्या खाण्याची शिफारस केली जाते.
तज्ज्ञांच्या मते, फळे आणि भाज्या दोन्हींचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत. फळे शरीराला त्वरित ऊर्जा देतात, तर भाज्या शरीराला दीर्घकालीन पोषण देतात. म्हणूनच दोन्हींचे संतुलित सेवन आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. मधुमेह असलेल्या लोकांनी फळे काळजीपूर्वक खायची असतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी त्यांच्या नाश्त्यात फळे आणि जेवणासोबत भाज्यांचा समावेश करावा.
एकूणच, फळे आणि भाज्या दोन्ही आरोग्यासाठी आवश्यक आहेत. मात्र, साखरेचे प्रमाण कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे भाज्या तुलनेने अधिक आरोग्यदायी मानल्या जातात. दुसरीकडे फळांमधील जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक ऊर्जा शरीराला ताजेतवाने ठेवतात. म्हणूनच दैनंदिन आहारात फळे आणि भाज्यांचा संतुलित वापर हा चांगल्या आरोग्याचा आधार आहे.
