What Happens If You Do Not Change Your Pillow: कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात आजारपण येऊ शकते. प्रत्येक घरात काही मूलभूत गोष्टी असतात. त्यामध्ये भांडी, गाद्या, उशा, कंटेनर, कटिंग बोर्ड, भांडी घासायचा स्पंज इत्यादींचा समावेश आहे. लोक या गोष्टींची स्वच्छता करतात; पण तुम्हाला माहीत आहे का की, त्यानंतरही या गोष्टींमुळे तुम्ही आजारी पडू शकता.

या वस्तू दीर्घकाळ वापरल्याने या गोष्टींमध्ये जंतू आणि जीवाणू वाढण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ- बेडशीट, उशीचे कव्हर धुऊन स्वच्छ करता येतात. पण, गाद्या किंवा उशा धुता येत नाहीत. अशा परिस्थितीत त्यात हळूहळू घाण आणि जीवाणू जमा होऊ लागतात म्हणून त्या बदलणे आवश्यक आहे.

बांबूचे कंटेनर

बरेच लोक स्वयंपाकघरात बांबूची भांडी वापरतात. तज्ज्ञांच्या मते, ही भांडी दर दोन ते तीन वर्षांनी बदलली पाहिजेत. त्यांचा जास्त काळ वापर केल्याने बुरशी येऊ शकते. ओलाव्याच्या संपर्कात आल्याने जीवाणूंचा धोकादेखील वाढू शकतो.

भांडी धुण्याचा स्पंज

भांडी धुण्याच्या स्पंजमध्ये जीवाणू सर्वांत वेगाने वाढतात. अशा परिस्थितीत जंतूंना मारण्यासाठी तुम्ही दर १-२ आठवड्याने तो बदलणे इष्ट ठरते.

कटिंग बोर्ड

दर एक ते दीड वर्षाने स्वयंपाकघरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वापरले जाणारे कटिंग बोर्ड बदलणे आवश्यक आहे. कच्चे मांस आणि भाज्यांसाठी वेगवेगळे कटिंग बोर्ड वापरावेत.

नॉन-स्टिक पॅन

स्वयंपाकघरात वापरल्या जाणारा नॉन-स्टिक पॅनचे कोटिंग कालांतराने खराब होऊ शकते आणि त्यामुळे अन्नात हानिकारक रसायने जाऊ शकतात. म्हणून उच्च गुणवत्ता असलेले पॅन किंवा नॉन-स्टिक भांडी खरेदी करा. दर तीन ते पाच वर्षांनी ती बदलत राहा.

उशा

तुमच्या उशांमुळे तुम्हाला अॅलर्जी आणि श्वसनासंबंधी समस्या उदभवू शकतात. म्हणून कोणत्याही उशीचा वापर फक्त एक ते दोन वर्षांसाठी करा.

गादी

दर दोन महिन्यांनी गादी नेहमी उन्हात ठेवावी. तसेच काठी आपटून, त्यावरील धूळ काढून टाकण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय वेळोवेळी गादी उलटी करून त्याचा वापर करा आणि गादीवर बेडशीटव्यतिरिक्त एक कव्हर ठेवा. तसेच गादीचा वापर केवळ ७-१० वर्षापर्यंत करा.