वाहन उद्योगामध्ये बऱ्याच काळापासून असलेल्या मंदीचा फटका ऑटोमोबाइल क्षेत्रातील 10 लाख नोकऱ्यांवर पडू शकतो. कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी कार उत्पादकांच्या संघटनेने (एक्मा, Auto Component Manufacturers Association of India ) संपूर्ण ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी सारखाच जीएसटी म्हणजे 18 टक्के करावा, अशी मागणी केली आहे. जवळपास 50 लाख कर्मचारी या संघटनेशी संलग्न आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कार उद्योगात गेल्या काही काळात अभूतपूर्व मंदी आली आहे. कार उत्पादनात सध्या 15 ते 20 टक्के कपात झालीये, परिणामी, या क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार आली आहे. सध्या 70 टक्के कार उपकरणं 18 टक्के जीएसटीच्या श्रेणीत येतात, तर उर्वरीत उपकरणांवर 28 टक्के GST भरावा लागतोय. याशिवाय काही वाहनांवर सेसही भरावा लागतो. हा कर एकसमान केला तर कारउद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळेल’,असं ‘एक्मा’ या संघटनेचे अध्यक्ष राम व्यंकटरामाणी म्हणाले.

‘केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे सामान्य वाहन उद्योगाचं भवितव्य अधांतरी आहे. वाहन क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाली आहे. जर एकसारखा 18 टक्के जीएसटी केला तर अनेक नोकऱ्या वाचू शकतात’ असंही ते म्हणाले.