या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिशादर्शित प्रथिनांचा वापर करून कर्करोगातील केमोथेरपी उपचारात केवळ कर्करोगग्रस्त पेशीच मारण्याची व्यवस्था करता येऊ शकेल, असे नव्या संशोधनात दिसून आले आहे. केमोथेरपीने कर्करोगग्रस्त पेशी मरत असल्या तरी त्यामुळे इतर पेशीही मरतात त्यामुळे केस जाण्यापासून अपंगत्वापर्यंत परिणाम होतात. एखाद्या वेळी कर्करोगाची गाठ मारण्यासाठी व्यक्तीला झेपणार नाही एवढी औषधाची मात्रा द्यावी लागते. जर कर्करोगाच्या गाठीला रक्तपुरवठा व्यवस्थित नसेल तर जास्त औषध वापरावे लागते व ते इतर पेशींना धोकादायक असते. प्रतिपिंडांचा वापर करून औषध थेट गाठीत सोडण्याचे तंत्रही उपलब्ध आहे त्यामुळे केमोथेरपीतील दुष्परिणाम टाळता येतात. स्टॅनफर्ड विद्यापीठातील जेनिफर कोरान यांच्या मते सुनियंत्रित प्रथिनांच्या मदतीने कर्करोगाच्या गाठीत औषधे पाठवता येतात. दोन्ही तंत्रे सारखीच असली तरी विशेष प्रथिनाचा फायदा जास्त असतो कारण त्यात मेंदूचे संरक्षण होते, पण मेंदूतील गाठी मात्र नष्ट करता येतात. प्रतिपिंडापेक्षा लहान अशी ही प्रथिने कमी रक्तपुरवठा असलेल्या गाठींपर्यंत पोहोचू शकतात. प्रतिपिंड हे घट्ट असलेल्या गाठीत पोहोचू शकतात व त्यांचा आकार मोठा असल्याने गाठीत जाण्यास त्यांना सोपे नसते. लहान रेणू गाठीमध्ये व्यवस्थित पसरू शकतो असे कोरान यांचे म्हणणे आहे. प्रतिपिंड व सुनियंत्रित प्रथिने यांच्यापैकी कोणता मार्ग कर्करोगावर उपचारासाठी उपयुक्त आहे याचा शोध घेतला जात आहे. जर्नल्स मॉलिक्युलर कॅन्सर थेरप्टिक्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoiding possible effects of chemotherapy
First published on: 22-06-2016 at 02:42 IST