Cholesterol and Coffee: आपली जीवनशैली इतकी अस्थिर आहे की, एक ठराविक दिनचर्या पाळणं खूप कठीण होऊन जातं. खाण्या-पिण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा हे सर्व इतकं अस्थिर होतं की हळूहळू काही आजार शरीरात घर करू लागतात. मग अवेळी भूक लागणे, अवेळी झोप येणे या समस्या तुम्हालाही जाणवल्या असतीलच. मग आपण आधार घेतो तो चहा-कॉफीचा. पण याचा एकूणच आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे माहीत आहे का…

कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे, जो आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये आढळतो. आपल्या शरीराला एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन, व्हिटॅमिन डी सारखे हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते आणि ते अन्न पचण्यासाठीदेखील मदत करते. अंड्यातील पिवळा भाग, मांस आणि चीज यामध्ये कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉल हे आपल्यासाठी वाईट नाही, पण त्याचे प्रमाण जास्त वाढल्यास मात्र चिंता वाढू शकते.

कॉफीचा कोलेस्ट्रॉलवर कसा परिणाम होतो?

कॅफीन शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी थेट वाढवत नसले तरी त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्यास हातभार लागू शकतो. कॅफिनमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे कॉर्टिसोलची व परिणामी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. याव्यतिरिक्त, कॅफीनमुळे इन्सुलिनच्या पातळीत वाढ होऊ शकते, ज्यामुळे एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉलचे कमी होते.

कॉफी कशा पद्धतीने बनवावी?

तज्ज्ञांच्या मते, कॉफीमुळे एखाद्या व्यक्तीच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोका हा कॉफी बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. खरं तर कॉफी बीनमधील कॅफिन हे कोलेस्ट्रॉलवर परिणाम करणारे नसून त्यात नैसर्गिकरित्या आढळणारे तेल खरे कारण असते. कॅफेस्टोल आणि काहवेल खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. फिल्टर न केलेल्या कॉफी आणि फ्रेंच प्रेस कॉफीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. पण इन्स्टंट कॉफी आणि फिल्टर कॉफीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी असते.

दिवसाला किती कप कॉफी घ्यावी?

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, फ्रेंच प्रेस ब्रूइंग पद्धतीने चार आठवड्यांपर्यंत ५ कप कॉफी/प्रति दिवस प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी ६ ते ८ टक्क्यांनी वाढू शकते. दिवसातून १-२ कप कॉफी प्यायल्यास धोका कमी होतो.