देशातील प्रमुख मोटरसायकल निर्माता कंपनी Bajaj Auto ने भारतातील आपल्या प्रवासाची सुरूवात स्कूटरने केली होती. ‘हमारा बजाज’ ही त्यांची टॅगलाइन सर्वत्र लोकप्रिय होती, मात्र नंतर कंपनीने केवळ बाइक बनवण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं. पण, आता स्कूटर्सच्या वाढलेल्या मागणीमुळे बजाज पुन्हा एकदा स्कूटर निर्मितीच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. ही स्कूटर ‘बजाज ऑटो’च्या इलेक्ट्रिक डिव्हिजन Bajaj Urbanite च्या माध्यमातून भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे.

नव्या रुपातील बजाज स्कूटर ही इलेक्ट्रीक स्कूटर असून तिची चाचणी सुरू आहे. या स्कूटरच्या चाचणी दरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो लीक झाले आहेत. या इलेक्ट्रीक स्कूटरबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र याचं डिझाइन काही प्रमाणात जुन्या स्कूटरप्रमाणेच असणार आहे. रेट्रो आणि मॉडर्न लूकमधील बॅलन्स साधण्यासाठी स्कूटरमध्ये अलॉय व्हिल्ज, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक आणि एलईडी हेडलॅम्प व टेल लाइट असू शकते.

चांगल्या सुरक्षितेसाठी यामध्ये इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम असणार आहे. त्याशिवाय मोठा डिजीटल इन्स्ट्रूमेंट पॅनल असू शकतो. यामध्ये बॅटरी रेंज, ओडोमीटर आणि ट्रिपमीटरची माहिती उपलब्ध असेल. स्मार्टफोन आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी इन्स्ट्रूमेंट पॅनल ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करेल. ही स्कूटर या वर्षाच्या अखेरीस किंवा 2020 च्या सुरूवातीला लाँच केली जाण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 60 ते 80 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात, मात्र बजाजची ही स्कूटर प्रीमियम श्रेणीतील असल्याची शक्यता आहे, त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर  100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करेल, अशी शक्यता आहे.