Bedsheet Hygiene Tips : पलंगावरील गादी खराब होऊ नये म्हणून आपण ती चादरीने झाकतो. गादीच्या आकारानुसार लहान- मोठ्या चादरीचा वापर केला जातो. प्रत्येक सणासुदीच्या काळात आपण पलंगावरील चादर बदलत असतो. पण, सततच्या वापरामुळे चादरी खूप मळकट होतात. त्यातून कुबट वास येऊ लागतो. अनेकदा चादरीचा रंग खूप गडद असतो. त्यामुळे त्यावर धूळ, माती किंवा घाणेरडे डाग सहज दिसत नाहीत; पण चादर कोणत्याही रंगाची का असेना, ती वेळीच बदलली पाहिजे; अन्यथा विविध आजारांचा धोका वाढतो. पण, चादर नेमकी किती दिवसांनी बदलावी याविषयी जाणून घेऊ…
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पलंगावरील चादर दर आठवड्याने बदलली पाहिजे. कारण- त्यावर घाण, जीवाणू व जंतू जमा होतात. त्या स्वच्छ करण्यासाठी चादर आठवड्यातून किमान एकदा धुवावी. घाणेरड्या आणि जुन्या चादरीवर झोपल्याने त्वचेचा संसर्ग आणि अॅलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात. स्वच्छ चादरीवर केवळ चांगली झोप लागण्यास मदत होत नाही, तर आरोग्यही चांगले राहते.
तज्ज्ञ काय सांगतात?
तज्ज्ञांच्या मते, दर सहा ते सात दिवसांनी चादर बदलावी. जर घरात खूप धूळ जमा होत असेल, तर तीन ते चार दिवसांनी चादर बदलावी. उन्हाळ्यात खूप घाम येत असल्यास चादरीवर जीवाणू आणि बुरशी वेगाने वाढू शकते. अशा वेळी चादरीवरील जंतू दूर घालवण्यासाठी दर तीन ते चार दिवसांनी ती बदला. झोपतानाही एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवरील मृत पेशी चादरीवर आणि उशीवर पडतात, ज्या चादर झाडूनही पूर्णपणे निघत नाहीत, तसेच वातावरणातील धूळ, घामाचे बारीक कण या सगळ्या गोष्टींमुळे चादरीवर जीवाणू वाढीस लागतात.
घाणेरड्या चादरीवर झोपल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान
धुळीने माखलेल्या आणि घाणेरड्या चादरीवर झोपल्याने श्वसनाच्या समस्या, अॅलर्जी आणि दम्याचा धोका वाढू शकतो. घाणेरड्या चादरी आणि उशांवर झोपल्याने चेहऱ्यावर किंवा त्वचेवर मुरमांची समस्या वाढते. अशा चादरीवर झोपल्याने टाळूला खाज सुटते आणि कोंडा यांसारख्या समस्या वाढतात. मळकट, घाणेरड्या चादरींमधून कुबट वास येत असल्याने त्यावर चांगली झोप लागत नाही.
चादर धुताना घ्या ‘ही’ काळजी
चादर स्वच्छ धुतल्यानंतर ती उन्हात चांगली वाळवावी. त्यामुळे जंतू आणि जीवाणू सहज नष्ट होतात.
अॅलर्जीग्रस्त लोकांनी अँटी अॅलर्जेनिक चादर वापरावी.
चादर धुताना ती गरम पाण्यात चांगल्या दर्जाचे डिटर्जंट वापरूनच धुवावी.