Benefits Of Drinking Milk At Night : चांगली झोप ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. तुमचा दिवस कसा जाईल हे नकळतपणे तुमची रात्रीची झोपच ठरवते. त्यामुळे आहारापासून शारीरिक हालचालीपर्यंत आणखीन बऱ्याच गोष्टी तुमच्या झोपेवर नकळत परिणाम करीत असतात. पण, जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल, तर स्वयंपाकघरातील एक पदार्थ तुमची मदत करणार आहे. तर हा पदार्थ नक्की कोणता आहे चला जाणून घेऊयात…

तर जायफळ तुमची झोप सुधारू शकते. पण, फायदे मिळविण्यासाठी ते तुम्हाला कोमट दुधात मिसळावे लागेल. कोमट दुधात जायफळ घालून रात्री प्यायल्याने तुमची झोप आणि पचनशक्ती दोन्हींमध्ये सुधारणा होऊ शकते.

जायफळ घालून दूध पिण्याचे फायदे –

१. चांगली झोप लागते – जायफळामध्ये मायरिस्टिसिन नावाचा घटक असतो. त्यामुळे शरीर शांत होते. झोपण्यापूर्वी कोमट दुधाबरोबर जायफळाचे थोड्या प्रमाणात सेवन केल्यास मज्जासंस्था शांत होऊन, ताण कमी होण्यास मदत होते आणि चांगली झोप लागते. त्यामुळे निद्रानाशची समस्या असणाऱ्या लोकांसाठी हा नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरतो.

२. मेलाटोनिनची पातळी वाढते – कोमट दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते, ज्याची शरीरात मेलाटोनिन तयार करण्यास मदत होते. त्यातच दुधात जायफळ घातल्याने शरीराला अधिक आराम मिळतो, ज्यामुळे लवकर आणि गाढ झोप येणे सोपे जाते.

३. पचन सुधारते – जायफळात कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात. त्यामुळे पोटफुगी, गॅस, अपचन कमी होण्यास मदत होते. जायफळ दुधात मिसळल्याने पोटाच्या आतील आवरणाला आराम मिळतो, आम्लता कमी होते व पचनशक्ती सुधारते.

४. चयापचय वाढवते – जायफळातील सक्रिय घटक पाचक एंझाइम तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे पोषक तत्त्वांचे शोषण होऊन चयापचय सुधारते. रात्री एक कपभर दुधात जायफळ टाकून प्यायल्याने पचनसंस्था व्यवस्थित काम करून, आळस आणि अस्वस्थता शरीरातून काढून टाकण्यास मदत मिळते.

५. ताण आणि चिंता कमी होते – जायफळमिश्रित एक कपभर गरम दुधाने मन आणि शरीराला आराम मिळतो. जायफळातील शरीराला शांत करणारे घटक चिंता आणि तणाव कमी करतात; तर कोमट दूध सेरोटोनिनची पातळी वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो आणि चांगल्या झोपेसाठी तुमचे शरीर तयार होते.