Shruti Haasan Hair Oil And Haircare Routine : तुम्हीही किती छान मेकअप केला, अगदी कितीही महागडे, स्टायलिश कपडे घातलेत तरीही तुमचे केस त्या दिवशी व्यवस्थित सेट होत नसतील, तर तयार होण्यासाठी घेतलेली सगळीच मेहनत अगदी क्षुल्लक वाटायला लागते. त्यासाठी अनेक जण पार्लरमध्ये न जाता, घरीच हेअर स्ट्रेटनर वापरून केस स्ट्रेट करतात किंवा अगदी कायमचे केस हेअर स्ट्रेटनिंग किंवा केराटिन करतात. पण, जर तुम्हाला चमकदार, घनदाट, काळेभोर, लांब केस हवे असतील, तर आज एका अभिनेत्रीने अगदी सगळ्यात सोपा उपाय तुमच्यासाठी सांगितला आहे.

तेलुगू व हिंदी चित्रपटांत काम करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासन हिने नुकतीच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या घनदाट केसांचे रहस्य सांगितले आहे. रणवीर अलाहाबादियाने अभिनेत्रीच्या केसांबद्दल विचारताच तिने पॉडकास्टमध्ये एक महत्त्वाची टीप आणि तिच्या दिनचर्येबद्दल सांगितले आहे. त्यामध्ये तिच्या काळ्याभोर, लांब, घनदाट केसांचा रंग हा नैसर्गिक आहे आणि त्यासाठी ती फक्त तिळाचे तेल वापरते. कधी कधी ती मूडनुसार नारळ किंवा बदामाचे तेलसुद्धा त्यात मिसळते. पण, तीळ तिच्या केसांसाठी चमत्कारीत ठरले, असे तिने नमूद केले आहे.

तसेच अभिनेत्री श्रुती हासनने तिच्या दिनचर्येबद्दल बोलताना सांगितले की, ती केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावते. ती दररोज केस धूत नाही आणि इतरांनीही दररोज धुऊ नये, असा सल्लासुद्धा देते आहे. जर अभिनेत्रीचे दुसऱ्या दिवशी शूटिंग असेल, तर आदल्या रात्री ती तेल लावून झोपते आणि सकाळी उठून केस धुते आणि मग शूटला जाते, असे सांगत “सगळं काही तेलावरच अवलंबून आहे. तेल हेच सगळं काही आहे” ; असे ती आवर्जून म्हणताना दिसली आहे.

तिळाच्या तेलाचा केसांसाठी कसा फायदा होतो?

टाळूला पोषण – तिळाचे तेल व्हिटॅमिन ई, बी-कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारख्या आवश्यक खनिजांनी समृद्ध असते. तिळाचे तेल टाळूमध्ये खोलवर जाऊन, केसांच्या मुळांपर्यंत पोषण देते आणि निरोगी केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते.

केसगळती – तिळाच्या तेलातील अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्मांमुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस मजबूत होतात आणि ताण, कोरडेपणा किंवा कमकुवत मुळांमुळे होणारे केस गळतीसुद्धा काही प्रमाणात कमी होते.

नैसर्गिक कंडिशनर – तिळाचे तेल एक नैसर्गिक कंडिशनर आहे. त्यामुळे कोरडे आणि खराब झालेले केस मॉइश्चरायझ होतात. त्यामुळे केस मऊ, गुळगुळीत राहतात. नियमित तिळाच्या तेलाच्या वापरामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो.

किरणे आणि प्रदूषणापासून संरक्षण – तिळाचे तेल केसांभोवती एक संरक्षक आवरण तयार करते; ज्यामुळे हानिकारक किरणे, प्रदूषण व उष्णतेच्या नुकसानापासून संरक्षण होते. हा सूर्यप्रकाश रोखणारा उपाय कोणत्याही पर्यावरणीय परिस्थितीमुळे केसांना कमकुवत होण्यापासून थांबवू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोंडा आणि टाळूच्या संसर्गाशी लढा – तिळाच्या तेलामध्ये जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशी व दाहकविरोधी गुणधर्म आहे. त्यामुळे तिळाचे तेलाने खाज सुटलेल्या टाळूला आराम देण्यास आणि डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत मिळते.