Early Warning Signs of Blood Cancer: रक्ताचा कॅन्सर म्हणजे केवळ एक रोग नाही तर शरीरातील रक्तनिर्मिती करणाऱ्या ऊतींवर थेट हल्ला करणारा जीवघेणा आजार आहे. हा आजार एकदा झाला की शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कोलमडते, रक्तपेशींचं संतुलन बिघडतं आणि जीवघेणा धोका निर्माण होतो. जगभरातील वाढत्या प्रकरणांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असून, दर ५ मिनिटांनी एका व्यक्तीला रक्ताच्या कॅन्सरचे निदान होते आणि दरवर्षी जवळपास ७०,००० लोकांचा मृत्यू या आजाराने होतो, ही बाब धक्कादायक आहे.

रक्ताच्या कॅन्सरचे तीन प्रमुख प्रकार

१. ल्यूकेमिया (Leukaemia): ल्यूकेमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे, ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात.

२. लिम्फोमा (Lymphoma): लिम्फोमा कॅन्सर सर्वांत आधी रोगप्रतिकार क्षमतेच्या लिम्फोसाइट पेशींमध्ये पसरतो. या पेशीच संसर्गाशी लढत असतात आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबूत करतात. या पेशी लिम्फ नोड्स, बोन मॅरो, स्प्लीन आणि थायमसमध्ये उपस्थित असतात. त्यावरच या कर्करोगाचा परिणाम होतो.

३. मायलोमा (Myeloma): प्लाझ्मा पेशींवर हल्ला करून रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करणारा आजार.

सुरुवातीची इशारा देणारी ५ लक्षणं

१. सततचा थकवा आणि कमजोरी – साधा थकवा नाही तर दीर्घकाळ टिकणारा आणि कारण समजत नसलेला थकवा. रक्ताचा कॅन्सर शरीराला पुरेशा निरोगी रक्तपेशी तयार करू देत नाही, त्यामुळे अॅनिमिया व कायम थकव्याची समस्या होते.

२. नको असतानाही वजन घटणं – आहार किंवा व्यायाम न बदलता अचानक वजन कमी होणं हे धोक्याचं चिन्ह. तज्ज्ञ सांगतात की कॅन्सर पेशी मेटाबॉलिझम बदलतात आणि शरीराचं वजन झपाट्याने घटतं.

३. वारंवार संसर्ग होणं – रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे वारंवार सर्दी, ताप किंवा इतर संसर्ग होणे आणि त्यातून बाहेर पडायला जास्त वेळ लागणे.

४. सहज रक्तस्त्राव व निळे डाग – छोट्याशा जखमेनंतरही रक्त थांबायला वेळ लागणं, हिरड्यांतून रक्त येणं, शरीरावर सहज निळे डाग पडणं ही गंभीर चिन्हं.

५. रात्रभर घामाने भिजणं – तापमान सामान्य असतानाही झोपताना अंग घामाने चिंब भिजणं. हे लक्षण अनेक रोगांचं असलं तरी रक्ताच्या कॅन्सरशी थेट संबंधित मानलं जातं.

कोणाला जास्त धोका?

  • १४ वर्षांखालील मुलं आणि ४० वर्षांवरील प्रौढांमध्ये धोका अधिक.
  • तंबाखू आणि जास्त मद्यपानाने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
  • प्रदूषण, रसायनांचा व्यावसायिक संपर्क आणि अस्वस्थ जीवनशैली जोखीम वाढवते.
  • रक्ताचे आजार घराण्यात असले तर धोका दुप्पट होतो.

रक्ताचा कॅन्सर जितक्या लवकर ओळखाल तितक्या लवकर उपचार यशस्वी ठरतात. थकवा, वजन घटणं, वारंवार संसर्ग, सहज रक्तस्त्राव किंवा रात्रभर घाम येणं ही लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं तुमचं आयुष्य वाचवू शकतं.