त्वचेच्या कर्करोगावर निदान करणारा क्रांतिकारी शोध आस्ट्रेलियातील संशोधकांनी लावला आहे. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे निदान पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक उपयुक्त आणि अचूक होणार आहे. संशोधकांच्या मते, ‘लिक्विड बायोप्सी’ नामक या रक्त चाचणीमुळे मेलानोमा नामक त्वचेच्या कर्करोगाचे निदान अधिक जलद गतीने होणार असून यामुळे रुग्णाला उपचारासाठीही अधिक अवधी मिळणार आहे.
हा शोध रुग्णांना दिलासा देणारा असून मेलर्बनच्या ओलीवा न्युटॉन- जो कॅन्सर रिसर्च इन्न्स्टिटय़ूट(ओएनजेसीआरआय)मध्ये याविषयीचे संशोधन करण्यात आल्याची घोषणा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याच्या आरोग्यमंत्री जील हँसी यांनी केली आहे.
संशोधकांनुसार, या नव संशोधनामुळे त्वचेच्या कर्करोगाचे निदान होणार असून जुन्या पद्धतीनुसारच पण अधिक जलदपणे होणार आहे. यापूर्वी रुग्णांना या चाचणीसाठी ६ दिवसांचा कालावधी लागत होता, पण नव्या रक्त चाचणीमुळे केवळ ६ तासांत हे निदान होणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर त्यावरील उपचारदेखील करणे रुग्णांना शक्य होणार आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)