Bones Health: हाडे आपल्या शरीराचा पाया आहेत आणि यावरच आपले संपूर्ण शरीर टिकून राहते. आपली हाडे जितकी मजबूत असतील तितके आपण वयानुसार अधिक सक्रिय राहू शकतो. तरीही आजकाल लोक तरूण वयातच हाडांच्या वेदना आणि कमकुवतपणाची तक्रार करताना दिसतात. म्हणूनच आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली राखणे हे आपलं पहिलं काम आहे. यामुळे वृद्धापकाळात आपल्या हाडांना नुकसान होणार नाही.
हाडे मजबूत करणारा आहार
हाडे मजबूत बनवण्यासाठी संतुलित आहार असणे गरजेचे आहे. असे काही पदार्थ आहेत, जे तुमच्या हाडांच्या आरोग्याला हानी पोहोचवतात आणि काही असे निरोगी पदार्थ आणि सवयी आहेत ज्या हाडे दीर्घकाळ मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि चीज हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहेत. अनेकदा व्हिटॅमिन डी ने समृद्ध असतात. त्यामुळे याचे सेवन नक्की करावे.
पालेभाज्या
अनेकांना असे वाटते की, पालक, मेथी किंवा इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये फक्त जीवनसत्त्वेच भरपूर प्रमाणात असतात. मात्र, हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमदेखील असते जे हाडांना मजबूत ठेवते.
मासे
जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुमच्या आहारात सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल सारखे मासे समाविष्ट करा. यामध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असते, जे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
सुकामेवा
बदाम, अक्रोड आणि मखाना यासारख्या सुक्या मेव्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. ते हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
तीळ
एका मेडिकल वेबसाईटनुसार, तीळ हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक चमचा तीळात अंदाजे ८७.८० मिलीग्रॅम कॅल्शियम अशते. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने तुमच्या हाडांचे आरोग्य देखील सुधारू शकते.
हाडे मजबूत हवी असतील तर ‘या’ चुका अजिबात करू नका
हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही मीठ, सोडा आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे. बैठी जीवनशैली, प्रोसेस्ड फूडचे जास्त सेवन आणि कॅफिनचे अति प्रमाण यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य कमकुवत होते. तरीही सक्रिय जीवनशैली आणि काही प्रकारची दैनंदिन शारीरिक हालचाल हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकते.
