Renault या फ्रेंच मोटार कंपनीने आपली Renault Triber ही लोकप्रिय कॉम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) कार BS6 इंजिनसह लाँच केली आहे. कारच्या बेसिक मॉडेलच्या किंमतीत आधीपेक्षा 4,000 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत 29,000 रुपयांची वाढ झालीये. भारतात ही कार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आली होती.

रेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाइन असलेले दणकट, संक्षिप्त, ऐसपैस जागा असलेले, मॉडय़ुलर वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहून कमी जागेत सात व्यक्ती सहज बसू शकतात. ट्रायबर हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉडय़ुलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वैशिष्टय़े आहेत. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे.

Renault Triber कारच्या RxE व्हेरिअंटची किंमत आता 4.99 लाख रुपये झाली आहे. आधीपेक्षा किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. RxL व्हेरिअंटची किंमत २५ हजारांनी वाढून आता 5.74 लाख रुपये झालीये. तर RxT व्हेरिअंटही २५ हजारांनी महाग झाले असून यासाठी आता 6.24 लाख रुपये मोजावे लागतील. याशिवाय RxZ व्हेरिअंटच्या किंमतीत सर्वाधिक 29,000 रुपयांची वाढ झाली असून या टॉप व्हेरिअंटची किंमत आता 6.78 लाख रुपये आहे.  या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत.

भारतात ही कार ऑगस्ट 2019मध्ये लाँच झाली होती. यामध्ये 1.0-लिटर, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेले हे इंजिन 6250 rpm वर 72 PS ऊर्जा आणि 3500 rpm वर 96 Nm पीक टॉर्क निर्माण करते. गाडीत ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेंसर्स, स्पीड अलर्ट आणि पेडेस्ट्रियन प्रोटेक्शन यांसारखे सुरक्षिततेचे फीचर्स स्टँडर्ड म्हणजे सर्व व्हेरिअंटमध्ये आहेत. टॉप व्हेरिअंटमध्ये अजून दोन एअरबॅग्स म्हणजे एकूण चार एअरबॅग आहेत.