भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएलने) काही दिवसांपूर्वी आपली ‘संडे फ्री कॉलिंग’ ऑफर बंद करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्लॅनची मुदत वाढविण्यात आली आहे. बीएसएनएलच्या लँडलाईन यूजर्ससाठी ही फ्री कॉलिंग ऑफर जाहीर करण्यात आली होती. ग्राहकांकडून या प्लॅनला विशेष मागणी असल्याने तो बंद करणे योग्य होणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी ३ महिने या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. मात्र आता हे ३ महिने झाल्यावर हा प्लॅन बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या ब्रॉडबँड आणि लँडलाइन यूजर्ससाठी ही ऑफर देण्यात येत होती. काही यूजर्सकडून या प्लॅनची मोठ्या प्रमाणात निंदा करण्यात येत होती. त्यामुळे ही सुविधा बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता या प्लॅनची मुदत ३ महिन्याने वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ही ऑफर २१ ऑगस्ट २०१६ रोजी सुरु करण्यात आली होती. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर जाहीर केली होती. मात्र मोबाईलची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या घटत आहे. परंतु दुसरीकडे ‘संडे फ्री कॉलिंग’ ला ग्राहकांची पसंती असल्याने ही ऑफर वाढविण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.