बीएसएनएल BSNL या टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीने अखेर आपला पहिलावहिला मोबाइल बाजारात दाखल केला आहे. यासाठी कंपनीने डिटेल Detel या मोबाइल तयार करणाऱ्या भारतीय कंपनीशी भागीदारी केली असून या मोबाइलची किंमत हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. बीएसएनएलने हा फोन अवघ्या ४९९ रुपयांना उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र हा फोन घेतलेल्या ग्राहकांना बीएसएनएलची सेवा वापरावी लागेल. यातील आणखी एक विशेष बाब म्हणजे यात १५३ रुपयांचा टॉकटाईमही देण्यात येणार आहे. यामध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांना फोन करण्यासाठी प्रतीमिनिट १५ पैसे इतका दर आकारला जाईल. तर दुसऱ्या नेटवर्कवर फोन केल्यास ४० पैसे प्रतिमिनीट इतका दर आकारण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे.
डिटेल डी १ या फिचर फोनचा डिस्प्ले १.४४ इंचाचा आहे. हा फोन २ जी नेटवर्कचा असून यात सिंगल सीमचा पर्याय देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी ६५० मिलीअॅम्पियरची असल्याचे कंपनीने सांगितले. यासोबतच या फिचरफोनला टॉर्चलाईट, फोनबुक आणि लाऊडस्पीकर अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
रिलायन्स जिओने आपला मोफत फोन बाजारात आणल्यानंतर विविध कंपन्या या स्पर्धेत उतरल्या. मात्र जिओने आतापर्यंत केवळ एकदाच आपल्या फोनचे बुकींग घेतले आहे. पहिल्यांदाच जिओच्या फोनला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने त्यांना हे बुकींग बंद करावे लागले होते. त्यानंतर एअरटेलनेही मोबाइल लाँच केला होता. त्यानंतर आता बीएसएनएलने इतक्या कमी किंमतीचा फिचर फोन लाँच करत ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे.