सौंदर्यप्रसाधनांचा वापर स्त्रिया अधिक प्रमाणात करतात. तुलनेने पुरुष फारच कमी प्रमाणात सौंदर्यप्रसाधने वापरतात. कारण त्यांना सौंदर्यापेक्षा आपण अधिक रुबाबदार दिसावे, असे वाटत असते. त्यासाठी निरनिराळ्या साधनांचा ते वापर करीत असतात. कफलिंक हे त्यापैकी क. १६ व्या शतकात युरोपात या साधनांचा जन्म झाला आणि वसाहतवादी धोरणामुळे कफलिंक हे जगातील सर्व पुरुषांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले.
आपण अधिकाधिक सुंदर दिसावे अशी बहुतेक सर्वाची इच्छा असते. सौंदर्याच्या कल्पना व्यक्तिगणिक भिन्न असल्या तरी आपण किमान चारचौघांत उठून दिसावे, असे स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी आवडीनुसार जो-तो कमी-अधिक प्रमाणात सौंदर्यप्रसाधनांचा वापर करीत असतो. सौंदर्याच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक सजग असतात, तर पुरुषांना आपण रुबाबदार दिसावे, असे वाटत असते. त्यासाठीच मग शर्ट अथवा कोटावर कफलिंक्स, टाय, बो, बेल्ट अशी आभूषणे वापरली जातात. कफलिंक्सचा वापर १६ व्या शतकात युरोपात सुरू झाला. पुढे युरोपमधील राष्ट्रांच्या वसाहतवादी धोरणामुळे १८ व्या शतकात कफलिंक्स सर्वपरिचित झाले. आता जे आधुनिक कफलिंक्स वापरले जातात, ते १९ व्या शतकाच्या मध्यावर सर्वप्रचलित झाले. कफलिंक्स इझिली रिमूव्हेबल असल्याने बटनाला विकल्प म्हणून ते लोकप्रिय होत गेले. कफलिंक्स हे प्लॅटिनम, कार्बन फायबर, क्रिस्टल, ग्लास, टिटॅनियम, गन मेटल, ऑन्टस, सिल्क, स्टेनलेस स्टील, स्टìलग सिल्वर आणि सोन्यापासून तयार केले जातात.
सिल्क नॉट कफलिंक्स
‘सिल्क नॉट’ सर्वसाधारणपणे चेन लिंक कफलिंक्ससारखेच असतात, परंतु याचे दोन्ही हेड हे एका सिल्कच्या धाग्याने जोडलेले असतात. याच्या दोन्ही बाजूचे हेडही सिल्कच्या गाठीपासूनच बनविले जातात. एकरंगीय आणि बहुरंगीय पद्धतीमध्ये उपलब्ध असलेले हे कफलिंक बाह्य़ांना कॅज्युअल परंतु आकर्षक लूक प्रदान करतात. सिल्क नॉट कफलिंक्स हे किमतीने स्वस्त परंतु कमी टिकाऊ असतात. अनौपचारिक प्रसंग किंवा कार्यालयीन वापरासाठी हे कफलिंक्स फारच उत्तम.
व्हेल बॅक क्लोजर कफलिंक्स
व्हेल बॅक क्लोजर कफलिंक्सचा वरील भाग म्हणजे पृष्ठभाग हा सपाट असतो. त्याखालील लॉक हे देवमाशाच्या शेपटीसारखे सपाट आणि सरळ असते. कफलिंक्सचा वरील भाग हा आकर्षक आणि आकाराने मोठा असल्याने आणि लॉक सहजासहजी लावता येण्यासारखा असल्यामुळे व्हेल बॅक क्लोजर कफलिंक्स हे पुरुषांमध्ये लोकप्रिय आहेत.
फ्रॅब्रिक कफलिंक्स
दररोजच्या वापरामधील सर्वात लोकप्रिय कफलिंक्स म्हणजे फॅब्रिक कफलिंक्स. या कफलिंकच्या वरील हेड हे एका गोलाकार फॅब्रिक बटनपासून बनविलेले असते. हे कफलिंक्स लॉक करण्याची पद्धत ही बुलेट बॅक कफलिंक्ससारखीच असते. साधे परंतु उठावदार दिसणारे हे कफलिंक्स सर्व प्रकारच्या शर्ट्सवर शोभून दिसतात.
स्टड/बटन कफलिंक्स
या प्रकारात नेहमीच्या कफलिंक्ससारखी बिजागरं किंवा लॉक नसतात. या कफलिंक्सचा पृष्ठभाग हा आकाराने मोठा आणि नक्षीदार असतो. वरच्या हेडला जोडून एक छोटा खांब आणि त्या खांबाला जोडलेला आणखी एक छोटा गोलाकार हेड अशी या कफलिंक्सची रचना असते. छोटे हेड शर्टाच्या बाह्य़ांमध्ये खोचून हे कफलिंक्स बटनसारखं वापरलं जातं. मूिव्हग म्हणजेच हलण्याजोगा भाग नसल्यामुळे हे कफलिंक्स घालायला अतिशय सुरक्षित आणि जास्त काळ टिकणारे आहेत. या कफलिंकचे वैशिष्टय़ म्हणजे याचे दोन्ही हेड हे एकाच मटेरियल आणि डिझाइनपासून बनविले जातात. बॉस, मॅनेजर अशा वरच्या हुद्दय़ावर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्टड/बटन कफलिंक्स खूप लोकप्रिय आहेत.
बुलेट बॅक अॅण्ड टोगल क्लोजर कफलिंक्स
ढोबळ मानाने ‘व्हेल बॅक..’सारखेच दिसणाऱ्या या कफलिंक्सच्या रचनेत किंचित फरक असतो. पृष्ठभागावरील डिझायनर हेडला दोन खांब जोडलेले असतात. त्या खांबामध्ये एक बुलेट म्हणजेच गोळीच्या आकाराचा सिलेंडर जोडलेला असतो. तो सिलेंडर आपण ९० अंशाच्या कोनात फिरवू शकतो. आकर्षक डिझाइन आणि बुलेटच्या आकाराचे लॉक यामुळे हे कफलिंक्स आपल्या शर्टाला एक वेगळीच चमक मिळवून देते. फॉर्मल आणि ऑफिस शर्ट्सवर हे कफलिंक्स आकर्षक वाटतात.
लॉकिंग कफलिंक्स
घडय़ाळ्याच्या बिजागराप्रमाणे दिसणारे लॉकिंग कफलिंक्स हे सध्या तरुण पिढीमध्ये फार लोकप्रिय आहेत. या कफलिंक्समध्ये डय़ुएल अॅक्शन फोल्डेबल लॉक सिस्टिम असते. आकर्षक आकार, वैशिष्टय़पूर्ण डिझाइन आणि समकालीन स्टाइलमुळे हे कफलिंक्स घालायला सहज आणि सुरक्षित असतात. पार्टी शर्टस्वर हे कफलिंक्स फार उठावदार दिसतात.
बॉल रिटर्न कफलिंक्सचा पृष्ठभाग आकाराने मोठा आणि गोलाकार असून त्यात एक बॉल बसविलेला असतो. चेन कफलिंक्सपेक्षा फिटिंगला थोडे घट्ट असलेल्या या बॉल कफलिंक्सची किंमत त्यात वापरण्यात आलेल्या लोखंडाप्रमाणे बदलते. किफायतशीर दरात तसेच महाग किमतीलाही हे कफलिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. बुलेट किंवा व्हेल बॅक कफलिंक्सपेक्षा हे कफलिंक्स अधिक आकर्षक दिसतात. त्याचबरोबर प्रत्येक प्रकारच्या शर्ट्सवर हे कफलिंक्स उठून दिसतात.
तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय आणि आवडता कफलिंक्सचा प्रकार म्हणजे फॅशनेबल कफलिंक्स. या कफलिंक्सचे वैशिष्टय़ म्हणजे त्याच्या वरील बाजूच्या हेडवर असणारी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण अशी डिझाइन्स. या कफलिंक्सच्या खालच्या बाजूचे हेड हे बुलेट बॅक कफिलक्स किंवा व्हेल बॅक कफलिंक्ससारखेच असते. मुश्ताच, नट बोल्ट, पेन्सिल, विंटेज लायब्ररी स्टॅम्प अशा अनेक नानाविध प्रकारच्या आणि हटके डिझाइन्समध्ये हे कफलिंक्स बाजारात उपलब्ध असतात.
चेन लिंक कफलिंक्समध्ये दोन समान आकाराचे हेड हे एका छोटय़ा चेनने जोडलेले असतात. हे कफलिंक्स दिसायलाही खूप उठावदार दिसतात आणि त्यात असलेल्या साखळीमुळे आपण शर्टाच्या बाह्य़ा लूझ किंवा टाइट करू शकतो.