Cancer Symptoms in Body: खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली यांमुळे सध्या अनेक गंभीर आजारांची शक्यता झपाट्याने वाढत आहे. त्यापैकी एक आहे कोलन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कर्करोग. हा कर्करोग मोठ्या आतड्याच्या आतल्या भागातून सुरू होतो आणि सुरुवातीला छोट्या छोट्या गाठी किंवा पॉलिप्सच्या रूपात दिसतो. जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत, तर तो पुढचा टप्पा गाठू शकतो.
मोठे आतडे हा पचनसंस्थेचा शेवटचा भाग असतो, जिथून शरीरातील कचरा बाहेर टाकला जातो. जेव्हा मोठे आतड्यामधील पेशी अनियंत्रितपणे वाढायला लागतात, तेव्हा तो कर्करोग होऊ शकतो. आधी हा आजार फक्त वृद्धांमध्ये दिसत होता; पण आता तरुणांमध्येही त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (CDC) च्या वंडर डेटाबेसमधील माहितीप्रमाणे, १९९९ ते २०२० या काळात १० ते ४४ वयोगटातील लोकांमध्ये मोठ्या आतड्याच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आधी हा आजार मुख्यतः वयस्क लोकांमध्ये आढळत होता; पण आता हे चित्र बदलत आहे.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीने नुकत्याच दिलेल्या अहवालात सांगितले आहे, कीया आजाराच्या प्रत्येकी पाच निदानांपैकी एक रुग्ण ५५ वर्षांखालील असतो. अजूनही मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्यामागचं अचूक कारण स्पष्ट झालेलं नाही. पण, सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार या आजारासाठी वातावरणीय (Environmental) आणि आनुवंशिक (Genetic) कारणे जबाबदार असू शकतात.
हा आजार झपाट्याने पसरतो त्यामुळे याबाबत सावध राहणे खूप गरजेचे आहे. जेव्हा हा आजार शरीरात विकसित होतो, तेव्हा काही लक्षणं दिसू लागतात. जर ही लक्षणं वेळेत ओळखली गेली, तर जीवघेण्या मोठ्या आतड्याच्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि ती कशी ओळखावीत.
कोलन कॅन्सरचा धोका वाढवणारी कारणे (Colon Cancer Signs in Body)
- खराब आहार कोलन कॅन्सरचा धोका वाढवतो. आहारात फायबरची कमतरता कोलन कॅन्सरचं कारण ठरू शकतं
- शरीराची हालचाल कमी होणं देखील या कॅन्सरचा धोका वाढवू शकतं
- धूम्रपान आणि दारूसारख्या व्यसनाधीन पदार्थांचे सेवन
- कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास
- वाढता लठ्ठपणादेखील कॅन्सरचा धोका वाढवू शकतं.
वजन झपाट्याने कमी होणे (Weight Loss Cancer Symptoms)
धर्मशिला नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्ली येथील वरिष्ठ कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नीरज गोयल यांच्या मते, जर कोणतंही स्पष्ट कारण नसताना वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ते मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचं सुरुवातीचं लक्षणं असू शकतं. जर डाएटिंग किंवा जीवनशैलीत काहीही बदल न करताही वजन कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलं शरीर आत चालू असलेल्या आजारांबद्दल आपल्याला सतत संकेत देत असतं. जर ही लक्षणं वेळेवर ओळखली गेली, तर उपचार सोपे आणि प्रभावी ठरू शकतात.
बद्धकोष्ठता (Constipation Cancer Symptoms)
शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे, जसं की सतत आणि वारंवार होणारी मलबद्धता हे कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर पूर्वीच्या तुलनेत शौचालयाला जाण्याचा पॅटर्न बदलत असेल, तर लगेच सावध व्हावं. दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठतेचा त्रास होणं, पोटात दुखणं, अस्वस्थता जाणवणं किंवा पोट पूर्णपणे साफ होत नाही असं वाटणं ही सगळी लक्षणं आतड्याच्या कर्करोगाची शक्यता दर्शवू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः जेव्हा ती वारंवार उदभवत असतील. वेळेवर तपासणी करून, डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही गंभीर आजार लवकर ओळखता येईल.
शौचासोबत रक्त येणे (Piles Cancer Symptoms)
शौचासोबत रक्त येणं हे फक्त मूळव्याधमुळेच होत नाही, तर त्यामागे इतर अनेक आजारही कारणीभूत असू शकतात. आतड्याच्या कर्करोगाचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे शौचासोबत रक्त येणं. काही वेळा रुग्णांच्या शौचासोबत फक्त चिकट स्राव (म्यूकस) येतो किंवा शौचाचा रंग आणि बनावटही बदलते. जर तुम्हाला शौचामध्ये वारंवार रक्त, म्यूकस किंवा इतर कुठलेही असामान्य बदल दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
भूक न लागणे (Loss of Appetite Cancer Signs)
जर तुम्हाला नियमितपणे भूक लागत नसेल किंवा तुम्ही काही खाल्लं नसतानाही भूक लागत नसेल, तर हे आतड्याच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. अचानक आणि सतत भूक कमी होणं, ही शरीरातील एखाद्या गंभीर अंतर्गत समस्येची शक्यता दर्शवू शकते. आतड्याच्या कर्करोगामध्ये आतड्यावर ट्यूमरचा दबाव येतो, ज्यामुळे अन्नात रस वाटत नाही किंवा थोडं खाल्ल्यावरही लगेच पोट भरल्यासारखं वाटू लागतं.
अनीमियादेखील कोलन कॅन्सरचं कारण असू शकतं (Anemia Cancer)
जर तुम्हाला ॲनिमिया (रक्ताची कमतरता) होत असेल, तर हेही आतड्याच्या कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. आतड्यामध्ये हळूहळू होणाऱ्या रक्तस्रावामुळे रक्त शौचासोबत मिसळतं आणि ते दिसत नाही; पण हळूहळू शरीरात लोह (आयर्न) कमी होऊ लागतो. जर तुम्हाला सतत थकवा, अशक्तपणा, श्वास घ्यायला त्रास किंवा चक्कर येत असेल, तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. ॲनिमिया हे आतड्याच्या कर्करोगाचं एक लक्षण आहे.