scorecardresearch

रजोनिवृत्तीचा त्रास कमी करण्यासाठी आहारबदल उपयुक्त

आहारतज्ज्ञांच्या मतानुसार या काळात स्त्रियांनी आपल्या आहारात बदल केल्यास रजोनिवृत्ती काळातील हे त्रास कमी होतील.

प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्ली : वयोमानपरत्वे मासिक पाळी बंद झाल्याने येणारी रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांना काही शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना निद्रानाश, डोके-छाती गरम होऊन घामाघूम होणे (हॉट फ्लॅश), टोकाची भावनिक आंदोलनं (मूड स्विंग) आदी त्रासांना सामोरे जावे लागते. प्रत्येक स्त्रीनिहाय रजोनिवृत्तीची ही लक्षणे वेगवेगळी असू शकतात. आहारतज्ज्ञांच्या मतानुसार या काळात स्त्रियांनी आपल्या आहारात बदल केल्यास रजोनिवृत्ती काळातील हे त्रास कमी होतील.

आहारतज्ज्ञाच्या सांगण्यानुसार या काळात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. प्रथिनांमुळे वाढत्या वयात दुर्बल होत चाललेल्या स्नायूंची झीज भरून निघते. आदर्श पद्धतीनुसार या काळात आपल्या वजनाच्या प्रतिकिलो १.२ ग्रॅम प्रथिनांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. (दिवसाला सुमारे ६० ते ७५ ग्रॅम प्रथिने घ्यावीत) दोन्ही भोजनांत प्रत्येकी २५-३० ग्रॅम प्रथिने असावीत. मटण, मासे, अंडी, शेंगा, दुग्धजन्य पदार्थातून प्रथिने मिळतात. तसेच ओमेगा-३ मेदाम्लांचे सेवन केल्यास ‘हॉट फ्लॅश’चा त्रास कमी होतो. रात्री घामाघूम होण्याचे प्रमाण कमी होते. ‘ओमेगा-३ मेदाम्ले’ माशांमध्ये असतात. जवस, सब्जा, चिया बियाणांत ‘ओमेगा-३ मेदाम्ले’ आढळतात. तसेच कॅल्शियम, ड जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व आणि मॅग्नेशियमयुक्त आहार घ्यावा. रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन बदल होत असल्याने शरीरातील हाडे कमजोर होऊन हाडे ठिसूळ होण्याचा विकार (ऑस्टोपोरॉसिस) होतो. त्यामुळे कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. यात चीज, योगर्ट असे दुग्धजन्य पदार्थ, दूध, मसूर, काजू-बदामांचा आहारात समावेश करावा. या काळात स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन घटते. त्याचे संतुलन राखण्यासाठी फायटोइस्ट्रोजेन वनस्पती  घटक असलेले सोयाबीन, सोयाबीन उत्पादने, चणे, शेंगदाणे, टोफू (सोया दुधापासून तयार केलेले दही) यांचा आहारात समावेश असावा. शिवाय धान्य, फळे, भाजीपाल्याचे सेवन करावे, तंतुयुक्त आणि विषद्रव्ये निर्मूलन करणारे अन्न या काळात उपयोगी ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Changes in diet helpful in reducing menopause problem zws

ताज्या बातम्या