आजकाल कोणीही आयुष्यभर एकाच नोकरीत टिकून राहाण्याचा विचार करीत नाही. आजची पिढी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कमी काळासाठी अनेक ठिकाणी, प्रसंगी अनेक शहरांतून किंवा अनेक देशांतून सुद्धा प्रवास करीत असते. अधिक पगार मिळविण्याचे प्रलोभन तर यात असतेच. पण काहीवेळा सारखी-सारखी नोकरी बदलणे तुमच्या करीअरसाठी धोकादायक ठरू शकते. पगारात होणारी वाढ तुम्हाला त्या दिशेने ओढत असली, तरी दीर्घकाळासाठी तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. पाहूयात सतत नोकरी बदलण्यामुळे तुमच्या आयुष्यावर आणि करियरवर काय परिणाम होतात….

तुमचे प्रमोशन हातचे जाऊ शकते

कोणतीही कंपनी प्रमोशन देण्याआधी कर्मचाऱ्यांचा भूतकाळ पाहते. यावरुन तुमचे स्थायित्व आणि निष्ठा दिसून येते आणि हे गुण कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी फार महत्वाचे ठरतात. जर तुम्ही अनेक नोकऱ्या केल्या असतील, तर नवीन ठिकाणी तुमच्याकडे अस्थिरतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. ज्याने तुमचे पद आणि भविष्यातील कमाई यांवर परिणाम व्हायची शक्यता असते.

तुमचे रिटायरमेंटचे आणि इतर फायदे धोक्यात येऊ शकतात

ग्रॅच्युइटी कायद्याप्रमाणे तुम्ही एका ठिकाणी सलग पाच वर्षे नोकरी केल्यावर ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी पात्र होता. ग्रॅच्युइटीची रक्कम रिटायर होताना किंवा नोकरी सोडताना तुम्हाला मिळते. त्याआधी नोकरी सोडल्यास तुम्ही या फायद्याला मुकता. बोनस, पगारवाढ इत्यादी फायदे कर्मचाऱ्यांना कंपनीत अधिक काळ टिकल्यावर मिळतात. तेव्हा नोकरी सोडताना तुम्हाला काय गमवावे लागणार आहे याचाही विचार करा.

तुम्हाला वाईट गुंतवणूक समजले जाऊ शकते

कुठल्याही कर्मचाऱ्याची निवड करताना कंपनीकडून अनेक गोष्टी पाहिल्या जातात. कर्मचाऱ्यावर प्रशिक्षणासाठी केला जाणारा खर्च आणि त्यावरील परतावा हा त्याचाच एक भाग असतो. कर्मचाऱ्याने नोकरी लवकर सोडल्याने हा खर्च वाया जाण्याची शक्यता असते. म्हणूनच नोकरी देणारे कोणाचीही निवड करण्याआधी त्याची किंवा तिची पार्श्वभूमी पडताळून पाहातात. वारंवार नोकरी बदलणाऱ्या उमेदवाराला वाईट गुंतवणूक समजले जाते आणि त्यांना अधिक पगारवाढ देऊ केली जात नाही.

सारखी नोकरी बदलण्याची इच्छा होत असेल तर…

बहुतांश कर्मचारी कमी पगार, सध्याचा बॉस, कामाचे वातावरण किंवा कंटाळा या कारणांसाठी नोकरी बदलतात. मात्र अशावेळी नोकरी बदलणे हा एकच मार्ग नसतो. त्यामुळे खालील काही गोष्टींचा विचार करणे हिताचे ठरू शकते.

तुम्हाला नवीन सुरूवात करावी लागेल: आधी तर तुम्हाला हे नीट समजून घ्यावे लागेल की प्रत्येक ठिकाणी बऱ्या-वाईट गोष्टी असणारच. बऱ्या गोष्टी फारच कमी असल्या तरच ही नोकरी सोडून दुसरी शोधणे तुमच्या हिताचे ठरेल. दुसऱ्या ठिकाणीसुद्धा बऱ्या गोष्टीच अधिक असतील याची खात्री नसते. काही वेळा तुमच्या समस्येवर उपाय तुमच्या बॉस किंवा इतर सहकाऱ्यांशी बोलणे एवढा सोपा असू शकतो.

विभाग बदलून पाहा: जर तुमचे सध्याचे काम तुमच्या आवडीचे नसले, तर त्याच कंपनीमध्ये इतर विभागांत काम मिळू शकते का ते पाहा. तुमच्या मॅनेजरशी बोलून तुमच्या आवडत्या विभागात काम आहे का याची चौकशी करा. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक कंपनी आंतर-विभागीय बदली करू देतात.

नोकरीची निवड सुज्ञपणे करा: जर तुम्ही घाईगडबडीत नोकरी बदललीत, तर चांगली नोकरी न मिळण्याची शक्यता अधिक असते. नवशिक्या तरुणांना विशेषकरून लवकरात लवकर कुठेही मिळत असलेली नोकरी करण्याची घाई असते. अशात चुका होण्याची शक्यता असते, ज्याने तुम्हाला लवकरच पुन्हा नोकरी बदलावी लागू शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही आधीच स्वतःच्या नैपुण्याला साजेशी नोकरी पाहा जिथे तुमची दीर्घकाळात चांगली भरभराट होईल. अशाने तुम्ही अधिक काळ ती नोकरी करू शकाल.

तुमच्या ऑफिसातील लहान-सहान समस्यांमुळे नोकरी बदलू नका. नोकरी बदलणे तुमचा शेवटचा पर्याय असू द्या. ते करण्याआधी इतर सर्व पर्याय पडताळून पाहा, ज्याने तुम्हाला तुमच्या कामातून सर्वोत्कृष्ट अनुभव, फायदे आणि हित साधता येतील.

 

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार