करोना काळात वर्क फ्रॉम होम करताना दिवसभराच्या कामानंतर मूड फ्रेश करण्यासाठी थंडगार पेय घेतलं की मनाला आणि शरीराला आराम मिळतो. तुम्ही शिकंजी हे थंडगार पेय घेतलं तर तुम्हाला नक्कीच आरामदायक वाटेल. शिकंजी हे पेय अनेकांच्या आवडीचं पेय आहे. या आवडत्या शिकंजी पेयामध्ये तुम्ही काही फ्लेवर्स मिसळले तर? तर या शिकंजीची चव अजूनच छान लागते. शेफ संजीव कपूर यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर प्लम शिकंजीची रेसिपी शेअर केली आहे. प्लम शिकंजीमध्ये त्यांनी काही हटके फ्लेवर्स मिक्स केले आहेत. त्यात मनुक्याचा गोडपणा, लिंबाची फोड आणि सोड्याबरोबर काही मसाले या पेयात मिक्स केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात शेफ संजीव कपूर यांची थंडगार प्लम शिकंजीची रेसिपी!
प्लम शिकंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१/२ टीस्पून – काळे मीठ
१ टीस्पून – सुका पुदीना
१/२ टीस्पून – लाल तिखट
१/२ टीस्पून – वाळलेल्या आंब्याची पूड
१ टीस्पून – चाट मसाला
१ टीस्पून – भाजलेले जिरे पूड
१/२ टीस्पून – सुका आले
५ – ताजे प्लम्स
१/२ कप – साखर
१ टीस्पून – लिंबाचा रस
१/२ कप – पाणी
१ – लिंबू
बर्फाचे तुकडे
कृती :-
मिक्सरच्या भांड्यामध्ये काळे मीठ, वाळलेल्या पुदिन्याची पाने, लाल तिखट, वाळलेल्या आंब्याची पूड, चाट मसाला, भाजलेली जिरेपूड आणि सुकलेल्या आल्याची पूड हे सर्व एकत्र करून बारीक वाटून घ्या. वाटलेली पूड बाजूला ठेवा.
मनुक्यांचे (प्लमचे) बारीक तुकडे करून घ्या.
गॅसवर एका पॅनमध्ये बारीक केलेले मनुके टाका. त्यात साखर आणि लिंबाचा रस टाकून चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घाला. यानंतर ८ ते १० मिनिट चांगले उकळवा. मनुके शिजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवा.
गार्निशिंगसाठी लिंबाचे पातळ असे गोल काप करा. काही मनुक्यांचेही पातळ काप करून घ्या.
आता एका काचेच्या ग्लासामध्ये १/४ टीस्पून वरील वाटेलली मसाल्याची पूड टाका. त्यानंतर त्यात मनुके साखर लिंबाचा रस टाकून उकळवून थंड केलेले पाणी त्यात टाका व मसाले चांगले मिक्स करून घ्या.
यात तुम्ही बर्फाचे तुकडे आणि पातळ लिंबाचे गोल काप केले ते टाका. त्यानंतर अजून बर्फाचे तुकडे टाकून त्यावर पुदिन्याची पाने टाका.
आता यात सोडा टाकून त्यावर गार्निशिंगसाठी मनुक्यांचे पातळ काप टाका.
View this post on Instagram
थंडगार प्लम शिकंजी सरबत पिण्यासाठी तयार आहे.