इतर व्याधींमुळेही रुग्णांमध्ये गुंतागुंत; दिल्ली सरकारच्या समितीचा निष्कर्ष
राजधानी दिल्लीत चिकुनगुनियाने आतापर्यंत १५ जणांचा बळी गेला आहे. मात्र केवळ याच आजाराने मृत्यू झालेले नाहीत, तर त्यासोबत रुग्णांमधील इतर व्याधीही जबाबदार असल्याचा निष्कर्ष दिल्ली सरकारच्या एका समितीने काढला आहे. त्याबाबतचा अहवाल शनिवारी जाहीर करण्यात आला. दिल्लीत आतापर्यंत चिकुनगुनियाचे १७०० रुग्ण आढळले आहेत.
दिल्ली सरकारने २० रुग्णांचा अभ्यास करून याबाबतचा निष्कर्ष काढला आहे. चिकुनगुनियाने मृत्यू होत नाही. मात्र काही वेळा गुंतागुंत निर्माण झाल्यास लहान मुले व वृद्धांना ते धोकादायक असते असे जाणकारांचे मत आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे मत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत चिकुनगुनियाने पहिला बळी घेतल्याने याच्या धोक्यांबाबत चर्चा सुरू झाली. त्या पाश्र्वभूमीवर हा दिलासा देण्यात आला आहे. मेंदूत गुंतागुंत निर्माण झाल्यास चिकुनगुनियाने मृत्यू ओढवू शकतो, असे मत हृदयरोगतज्ज्ञ के. के. अगरवाल यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, दक्षिण दिल्लीतील ७० वर्षीय गुलाब चंद गुप्ता यांचे १२ सप्टेंबरला निधन झाले. त्यांना कुठलाही आजार नव्हता, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कूलर किंवा इतर ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. यांसह विविध उपाययोजना कराव्यात अशी सूचना करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने चिकुनगुनियाला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली असल्याचे जैन यांनी सांगितले. आमच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.