How to Clean Gas Stove Burner at Home: स्वयंपाकघरात रोजचा गॅस वापरताना अनेक वेळा एक मोठी समस्या डोकेदुखी ठरते, ती म्हणजे गॅसचा बर्नर नीट न पेटणे. तेल, मसाले, दूध किंवा इतर पदार्थ गळून पडताच बर्नरवर चिकटलेले डाग हळूहळू गडद होतात आणि ते सहज निघत नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळा जेवण बनवताना बर्नरच्या छिद्रांतून नीट आच येत नाही, फक्त अर्धवट पेटलेला बर्नर चिडचिड वाढवतो. भांडी नीट तापली जात नाहीत. वेळ जास्त जातो आणि गॅसचा खर्चही वाढतो. पण, जर सांगितलं की फक्त स्वयंपाकघरातल्या काही साध्या वस्तूंनी तुम्ही ही समस्या कायमची सोडवू शकता, तर…?
सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हिडीओमध्ये असा भन्नाट जुगाड दाखवला आहे, ज्यामुळे बर्नर पुन्हा नवीन असल्यासारखा पेटू लागतो. यात लागणाऱ्या वस्तू तर प्रत्येक घरात नेहमीच असतात.
त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे कोमट पाणी, त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस, चमचाभर मीठ आणि बेकिंग सोडा (किंवा इनो). या चौघांची जोडी मिळाली की बस्स तुमच्या बर्नरच्या समस्येवर तोडगा नक्की निघालाच.
उपाय अगदी सोपा आहे. गॅसचा बर्नर कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस, मीठ आणि सोडा टाकून तयार केलेल्या द्रावणात काही तास बुडवून ठेवा. पाहता पाहता कार्बनचे कण, तेलकटपणा आणि चिकट घाण सुटून पाण्यात मिसळायला सुरुवात होते. नंतर बर्नर टूथब्रश किंवा तारेच्या काथ्याने घासला की तो चमकायला लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंद झालेली छिद्रं पुन्हा उघडतात आणि बर्नरच्या निळ्या जिवंत ज्वाळा नेहमीसारख्या तेजाने पेटू लागतात.
याचा फायदा दोन पटीने मिळतो. एक म्हणजे गॅस पूर्ण क्षमतेने पेटतो, त्यामुळे वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होते. दुसरं म्हणजे तुमचा स्वयंपाक जलद आणि समान उष्णतेत होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत गॅससमोर उभं राहणं किती त्रासदायक असतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, अशावेळी हा छोटासा घरगुती उपाय मोठं वरदान ठरतो.
येथे पाहा व्हिडीओ
लोकांनी या व्हिडीओवर दिलेल्या प्रतिक्रियादेखील भन्नाट आहेत. काहींनी लिहिलंय की, “बर्नर तर अगदी नव्यासारखा झाला”, तर काहींनी याला पैसे आणि वेळ वाचवणारा परफेक्ट जुगाड असं संबोधलं आहे.
तर मग अजून वाट कशाची पाहताय? लगेच हा उपाय करून बघा आणि तुमचा बर्नरही पूर्वीसारखा तेजाने पेटताना अनुभव घ्या.