Wash Basin Stains Cleaning: सुंदर स्वच्छ घर तिथे लक्ष्मीचा वावर असं म्हणतात. घरात आल्यावर जर तुम्हाला प्रसन्नता भासत नसेल तर त्याचा एकूणच स्वभावावर, आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ शो-शायनिंग, दिखावा म्हणून नाही तर तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सुद्धा घराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. असं पाहायला गेलं तर प्रत्येक जण आपापल्या परीने वेळ काढून घरातील फरशी, टॉयलेट, बाथरूम, दारं- खिडक्या स्वच्छ करतच असतो पण काही वेळा कितीही स्वच्छ केलं तरी वस्तू पुन्हा डागाळतातच. जसं की आपल्या घरातील किचन- बाथरूममधील बेसिन. सतत पाण्याच्या संपर्कात आल्याने धूळ- कचऱ्यापेक्षा जास्त चिवट असे पाण्याचे डाग या बेसिनची शोभा घालवतात. काही वेळा नळांच्या टोकाशी किंवा बेसिनमध्ये वापरलेल्या धातूंना पाण्यामुळे गंज चढून तेच ओघळ बेसिनवर पिवळ्या- तपकिरी डागांच्या रूपात दिसतात. आज आपण अगदी घरगुती पद्धतीने बेसिनवरच चिकट डाग कसे स्वच्छ करायचे हे पाहणार आहोत.

वॉश बेसिनची स्वच्छता: डाग व दुर्गंध असा करा छूमंतर

बेकिंग सोडा

सर्वात सोपा व सगळ्या घरांमध्ये आढळणारा एक उपाय म्हणजे बेकिंग सोडा. वॉश बेसिनमध्ये आपण चक्क या बेकिंग सोड्याची पेस्ट लावून ठेवू शकता, काही वेळाने हाताला जास्त कष्ट न देता बेसिनवरील चिकट डाग लगेचच मऊ पडू लागतील आणि मग साध्या पाण्याने जरी तुम्ही बेसिन धुतली तरी ती नव्यासारखी लखलखेल. बेकिंग सोडा पेस्ट साठी आपण लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचा वापर करू शकता. अगदी काहीच नाही तर पाणी मिसळून सुद्धा पेस्ट बनवता येते मात्र त्यात तुम्हाला अगदी हलक्या हाताने बेसिन घासावी लागू शकते.

कोल्ड ड्रिंक

आपण आजवर अनेकदा असे व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये कोल्ड्रिंकने टॉयलेट- बाथरूमची स्वच्छता केली जाते. खरोखरच कोल्ड्रिंक म्हणजेच कार्बोनेटेड (सोडायुक्त) पेयांमुळे चिकट डाग हलके होण्यास मदत होऊ शकते.

व्हिनेगर

जर तुमच्या बेसिनचे पाईप वारंवार तुंबत असतील आणि त्यामुळे पाणी साचून बेसिनमध्ये डाग पडत असतील तर व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण उत्तम पर्याय आहे. यामुळे पाईप मोकळा व्हाल मदत होऊ शकते शिवाय कुजलेल्या वस्तू पाइपातून पुढे ढकलल्या गेल्याने दुर्गंधी सुद्धा नाहीशी होऊ शकते.

हे ही वाचा<< २ कापूराच्या गोळ्यांचा ‘हा’ उपाय थंडीत तुमच्या टाचांना देईल आराम; भेगा होतील दूर, टाच राहील मऊ, पाहा Video

दरम्यान, जर तुमच्या घरातील वॉश बेसिक सिरॅमिकची असेल तर त्यावर स्टीलच्या/ तारेच्या काथ्याचा वापर चुकूनही करू नये अन्यथा चरे पडू शकतात. स्पंजने रोजच्या रोजच्या जरी बेसिन पुसून घेतली तरी पुरते किंवा आपण टूथब्रशचा वापर करून बेसिन स्वच्छ करू शकता.

नळाला पाणी लागून सतत गंज लागण्याचा त्रास कमी करायचा असेल तर आपण नळावर वबेसिनमध्ये सुद्धा मेणबत्ती फिरवू शकता, मेणामुळे पाणी साचून राहत नाही परिणामी डाग पडण्याचे प्रमाण कमी होते.