How To Clean Copper And Brass Utensils : श्रावण महिना हा पूजा आणि धार्मिक विधींसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यासाठी मंदिर किंवा घरातील पूजेसाठी तांब्या-पितळेची भांडी वापरली जातात. ही भांडी नेहमी वापरत नसल्याने काही दिवसांत ती काळी पडतात आणि त्यावर चिकट थर जमा होतो. त्यामुळे ही भांडी घासण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला ही भांडी स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. ज्या वापरून तुम्ही ही तांब्याची किंवा पितळेची भांडी न घासताही नव्यासारखी चमकवू शकता, तसेच आतूनही ही भांडी अगदी स्वच्छ होतील.
तांब्याची किंवा पितळेची भांडी कशी स्वच्छ करावीत?
एक मोठे भांडे घ्या. त्यात एक चमचा सायट्रिक अॅसिड किंवा टार्टरिक अॅसिड घाला. त्यात एक चमचा मीठ घाला. नंतर त्यात पाणी मिसळा. हे मिश्रण चांगले मिसळल्यानंतर त्यात काळवंडलेली तांब्या-पितळेची भांडी बुडवून ठेवा. थोड्याच वेळात या भांड्यांचा काळेपणा निघून जाईल आणि भांडी काही वेळातच स्वच्छ होऊ लागतील. त्यानंतर एक कापड घ्या आणि ज्या ठिकाणी भांड्यांवर चिकट डाग अजून दिसतोय, तिथे हलक्या हाताने घासून घ्या. अशा या कृतीने काही वेळाने ती भांडी आतूनही पूर्णपणे स्वच्छ होतील.
‘हे’ करायला विसरू नका.
या द्रावणाने भांडी स्वच्छ केल्यानंतर तांब्याची किंवा पितळेची भांडी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर ती कापडाने पुसून टाका. असे केल्याने भांडी लवकर काळी होणार नाहीत. ही पद्धत अवलंबल्याने तुम्ही काही मिनिटांत तुमची काळी पडलेली पितळेची किंवा तांब्याची भांडी नव्याने चमकवू शकता.