जागतिक तापमानवाढीचा परिणाम हिमाचल प्रदेशातील सफरचंदांच्या चवीवर होत आहे. वाढते तापमान व घटता हिमवर्षांव यामुळे सफरचंदे आता पूर्वीच्या चवीची राहिलेली नाहीत हे उत्पादकही खुलेपणाने मान्य करीत आहेत
सफरचंदांच्या कमी थंड वातावरणात येणाऱ्या प्रजाती आहेत. या प्रजाती कमी उंचीवरही तग धरू शकतात. हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात आता या प्रजातींचे प्रमाण जास्त आहे. पारंपरिक प्रजातींची लागवड कमी होत चालली आहे.
सफरचंद उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राकेश सिंह यांनी सांगितले की, सफरचंदाच्या पारंपरिक प्रजाती वाढवणे अवघड आहे. त्या कमी उंचीवरील भागात वाढत नाहीत. त्यांना ४००० फूट उंचीवरील भागात वाढवावे लागते. जागतिक तापमानवाढ व लहरी हवामान यामुळे पारंपरिक प्रजाती वाढण्यात अडचणी आहेत. गेल्या १-२ वर्षांत नवीन प्रजातींची लागवड केली जात आहे.
सिंह यांची सिमल्यातील कोटगड येथे सफरचंदाची बाग असून त्यांनी नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. त्यांची चव वेगळी आहे पण भारतीय ग्राहकांना ती आवडत नाही अशातला भाग नाही. वैज्ञानिकांनी मायकेल, ट्रॉपिकल ब्युटी व स्कूलमेट या नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. या प्रजाती लवकर फळे देतात व त्यांना कमी थंड हवामान चालते. हवामान बदलांचा त्यांच्यावर फार परिणाम होत नाही असे सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ  हॉर्टिकल्चरचे संचालक डॉ. नझीर अहमद यांनी सांगितले. दोन तीन दशकांची आकडेवारी बघितली तर हिमालयात हिमवर्षांव घटला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात सफरचंदाची लागवडही कमी होत गेली. हिमाचल प्रदेशात १ लाख हेक्टर जमिनीवर सफरचंदाची लागवड होते. त्यातून २ लाख शेतकऱ्यांना रोजीरोटी मिळते. सिमला, कुलू, लाहौल व स्पिटी हे प्रमुख सफरचंद उत्पादक भाग आहेत.
सफरचंदाचे पीक १६० -१८० दिवसात हातात येते व काही प्रजातींची सफरचंदे १३०-१४० दिवसात तयार होतात. काही ठिकाणी पीच, प्लम, अक्रोड यांची लागवड केली जाते. हिमाचल प्रदेश. जम्मू-काश्मीर व उत्तराखंड या राज्यात देशातील सफरचंदांपैकी ९५ टक्के उत्पादन होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change makes apple take on new avatars
First published on: 20-04-2015 at 02:29 IST