पावसाळय़ात सांधेदुखी जास्त वाढते असे आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे संशोधनाअंती सांगण्यात आले. गेल्या अनेक शतकांपासून पावसाळय़ाचा संबंध सांधेदुखीशी जोडला गेला आहे. अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूलने मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. अनेक रुग्णांनी पावसाळय़ात सांधेदुखीसाठी डॉक्टरांची भेट घेतल्याचे त्यात दिसत आहे. त्यातील विम्याचे दावेही पावसाळय़ात नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीशी जुळणारे आहेत.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार ११ दशलक्ष लोकांनी २००८ ते २०१२ दरम्यान सांधेदुखीसाठी डॉक्टरांची भेट घेतली. त्यात त्यांना पावसाळय़ात सांध्याची काळजी अधिक घेता का, जर सतत पाऊस पडत राहिला तर काय करता, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचे विश्लेषण केले असता सांधेदुखी व पावसाळी हवामान यांचा संबंध नसल्याचे दिसून आले. डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण पावसाळी काळात ६.३५ टक्के, तर इतर दिवसात ६.३९ टक्के होते. त्यामुळे पावसाळी हवामान व सांधेदुखीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा काही संबंध आहे असे आम्हाला वाटत नाही, असे हार्वर्ड मेडिकल स्कूलचे अनुपम जेना यांनी म्हटले आहे.