आजकाल कार्यालयीन कामापासून ते शाळा, महाविद्यालयीन कामे लॅपटॉपवर केली जात आहेत. वर्क फ्रॉम होम करताना लॅपटॉप सारखा डोळ्यांसमोर येतो. त्याच्यामुळे डोळे कधीकधी जड होतात. अशा परिस्थितीत डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतो. या उपायांमुळे डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा ताजेतवानी होते.

थंड पाण्याचा वापर

अनेक तास लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांमध्ये वेदना आणि जळजळ होते. डोळ्यातील वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. कामातून ब्रेक घेत थंड पाण्याचे थेंब डोळ्यावर मारा. असे केल्याने डोळ्यांची जळजळ आणि तणावही कमी होईल.

तुळस आणि पुदीन्याचा वापर

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुळस आणि पुदीना वापरा. यासाठी तुम्ही तुळशी आणि पुदीना पाने रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसर्‍या दिवशी या पाण्यात कापूस भिजवून डोळ्यावर ठेवा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि त्वचा तजेलदार होईल.

हेही वाचा – करोनातून बरे झाल्यानंतर घ्या ‘असा’ आहार आणि रहा ठणठणीत!

गुलाबपाण्याचा वापर

डोळ्यांना आराम देण्यासाठी गुलाबपाणी वापरू शकता. एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळा. यानंतर, त्यात सूती कपडा घाला आणि डोळ्यावर ठेवा. ५ मिनिटांनंतर काढा. आपण दिवसातून तीन ते चार वेळा हे करू शकता. यामुळे डोळ्यांची जळजळ आणि थकवा कमी होईल.