Dementia Symptoms: डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश या आजाराबाबत तुम्ही ऐकलंच असेल. अनेक जण याला सोप्या भाषेत विसरणे असे म्हणतात. डिमेन्शियाच्या परिस्थितीत स्मृती, विचार आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता प्रभावित होते. जगभरात मोठ्या संख्येने लोक डिमेन्शियाने ग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये जगभरात ५७ दशलक्ष लोकांना डिमेन्शिया झाला होता. दरवर्षी अंदाजे १ कोटी नवीन प्रकरणे नोंदवली जातात. त्यामुळे ते मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याचेही सातवे प्रमुख कारण आहे.

जगभरात डिमेन्शियाने ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०५० पर्यंत ती तिप्पट होण्याची अपेक्षा आहे. डिमेन्शियाची सुरूवातीची लक्षणे नेहमीच स्मृती कमी झाल्याच्या स्वरूपात दिसत नाहीत. तर शरीरातील इतर अवयवांच्या माध्यमातूनही दिसतात. पायांमधील काही बदल देखील डिमेन्शियाची लक्षणे दाखवू शकतात.

डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय?

डिमेन्शिया म्हणजे मेंदूवर परिणाम करणारी एक सामान्य स्थिती आहे. ही परिस्थिती सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य आव्हानांपैकी एक आहे. मेंदूच्या पेशी खराब झाल्यावर किंवा मरून गेल्यावर हा आजार विकसित होतो. त्यामुळे संज्ञानात्मक कार्य (cognitive skills), मन:स्थिती, वागणूक आणि व्यक्तिमत्त्वावर हळूहळू परिणाम होऊ लागतो. वय, उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी, लठ्ठपणा, जास्त वजन, धूम्रपान, अतिमद्यपान, शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय राहणे, मर्यादित सोशल लाइफ आणि नैराश्य यासह अनेक घटक डिमेन्शियाचा धोका वाढवतात.

डिमेन्शियाची लक्षणे पायामध्येही दिसतात…

डिमेन्शिया मेंदूशी संबंधित समस्या असल्याने लोक अनेकदा स्मृती कमी होणे किंवा गोंधळ होणे अशी त्याची प्राथमिक लक्षणे समजतात. असं असताना डिमेन्शियाची सुरूवातीची लक्षणे पायांच्या आरोग्यात आणि चालण्यात किरकोळ बदल म्हणून सुद्धा दिसू शकतात. कमकुवत पायांचे स्नायू, चालण्याची गती मंदावणे आणि बदललेली चाल हे मेंदू आणि शरीरातील संवाद तसंच रक्ताभिसरणात घट दर्शवू शकतात. हे मानसिक क्षमता कमी होण्यापूर्वी दिसून येऊ शकते. जर या शारीरिक लक्षणांचे निरीक्षण केले आणि उपचार लवकर सुरू केले गेले तर काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.

बंगळुरूमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अरूण एल. नाईक यांनी पायात दिसणाऱ्या लक्षणांबाबत सांगितले आहे. आपण कसे चालतो किंवा पावलं टाकतो यातील बदल हे भविष्यातील मेंदूशी संबंधित समस्यांचे सुरूवातीचे लक्षण असू शकते. चालण्याचा वेग कमी होणे, पायांच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा, चालण्याची पद्धत आणि समन्वयात बदल तसंच दुहेरी काम करण्यात अडचण येणे हे स्मृतीसंबंधित समस्या दिसण्यापूर्वीच डिमेन्शियाची सुरूवात दर्शवू शकते.

मेंदू आणि पायांच्या आरोग्याचा संबंध काय?

पायांचे आरोग्य बिघडणे किंवा चालण्याची पद्धत बदलल्याने मेंदूच्या कार्यावर कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल. तज्ज्ञांनी अधोरेखित केल्याप्रमाणे तुमच्या पायांचे आणि मेंदूचे आरोग्य तुमच्या कल्पनांपेक्षा जास्त जवळचे आहे. कमकुवत पाय संज्ञानात्मक घट वाढवू शकतात. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय असता, तेव्हा पायांचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे सारकोपेनिया होतो. वयाशी संबंधित स्नायूंचे नुकसान होते आणि त्यामुळे संज्ञानात्मक घट वाढू शकते. सक्रिय स्नायू मेंदूच्या आरोग्याला चालना देणारी रसायने सोडतात. २०२२च्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की, जे लोक हळूहळू चालतात, त्यांचा ब्रेन व्हॉल्यूम लहान असतो आणि काही वर्षांनंतर संज्ञानात्मक घट होण्याचा धोका जास्त असतो.

जर तुम्हाला डिमेन्शियाचा धोका कमी करायचा असेल, तर स्वत:ला सक्रिय ठेवा. तुम्ही चालणे आणि व्यायाम करून हे करू शकता. नियमित चालणे आणि व्यायाम केल्याने मेंदूचे आरोग्य आणि न्यूरॉनचे आरोग्य वाढवणारी रसायने बाहेर पडतात. जीवनशैलीत हे साधे बदल केल्याने डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.