नवी दिल्ली : एका वैद्यकीय अहवालानुसार चिंता आणि नैराश्यग्रस्त असलेल्या सर्व वयोगटांतील स्त्रिया आणि तरुणांत काही दीर्घकाळ राहणाऱ्या आजारांच्या (जुनाट आजार) प्रादुर्भावाची शक्यता असते. अमेरिकेत ४० हजार ३६० जणांच्या आरोग्याचे माहिती संकलन आणि विश्लेषण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०, ४० आणि ६० वर्षे वयाच्या व्यक्तींचे तीन गट करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यात २० वर्षे वयोगटातील चिंता आणि नैराश्यग्रस्त स्त्रियांत जुनाट आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता ६१ टक्के जास्त आढळली. ६० वर्षांच्या वयोगटातील चिंताग्रस्त विकार असलेल्या स्त्रियांत ही शक्यता तुलनेने कमी आढळली. तसेच २० वर्षे वयोगटातील चिंता-नैराश्यग्रस्त तरुणांत जुनाट आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता ७२ टक्क्यांनी वाढलेली आढळली. मात्र, ६० वर्षे वयोगटातील चिंताग्रस्त पुरुषांत या आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता फक्त आठ टक्केच आढळली. या अभ्यासातील निष्कर्षांशी सहमती दर्शवताना वैद्यकीय तज्ज्ञांनी असेही सांगितले, की ज्यांना मानसिक विकार आहेत त्यांचे शारीरिक आजार बरे होण्यास बराच वेळ लागतो. अशा व्यक्तींच्या मानसिक विकारांवर उपचार करून ते बरे झाल्यानंतर त्यांचे इतर शारीरिक आजार बरे होतात. याउलट ज्या व्यक्तींत जुनाट आजार असतात त्यांना मानसिक विकार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. कारण दीर्घकाळ त्रास देणाऱ्या जुनाट-दुर्धर आजारांमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर दुष्परिणाम होतो. हालचालींवर मर्यादा येतात. जीवनशैलीची गुणवत्ता खालावते. कामकाज, नातेसंबंधांवर परिणाम होतो. कर्करुग्णांवरील उपचार हे वारंवार, तीव्र स्वरूपाचे व इतर दुष्परिणाम घडवणारे असल्याने रुग्णाचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. यातून आलेल्या तणावग्रस्ततेतून ते एकलकोंडे होण्याचाही धोका असतो. जुनाट आणि दुर्धर आजारांमुळे बसलेला मानसिक धक्काही जिवाला धोका पोहोचवू शकतो. या काळात आलेली नकारात्मकता आणि नैराश्य नैसर्गिक असले तरी त्याच्या योग्य व्यवस्थापनाची गरज असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depression in women and young people cause chronic diseases zws
First published on: 17-05-2022 at 01:57 IST