नित्यनियमाने व्यायाम करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. पण ‘टाइप टू’ मधुमेह झालेल्या रुग्णांना व्यायामाची आवश्यकता अधिक आहे. दररोज अधिक प्रमाणात व्यायाम केल्यास ‘टाइप टू’ मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो, असा दावा स्वीडनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
‘टाइप टू’ मधुमेह होण्याची कारणे अनुवांशिकता किंवा बदलती जीवनशैली ही आहेत. जर कुटुंबीयांकडून (माता, पिता, भावंडे) यांच्याकडून रुग्णाला ‘टाइप टू’ मधुमेह झाल्यास त्याचा धोका तीन पटीने अधिक असतो. योग्य आहार, सकस आहार आणि व्यायाम यांमुळे हा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. मात्र स्वीडिश शास्त्रज्ञ म्हणतात की, जर टाइप टू मधुमेह झालेल्या रुग्णांना व्यायामावर भर दिल्यास या विकारावर नियंत्रण मिळवणे अधिक सुलभ जाईल.
स्वीडनमधील लुंड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ‘टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांवर व्यायामाचा परिणाम’ या विषयावर अभ्यास केला. टाइप टू मधुमेहींनी व्यायाम करणे खूपच आवश्यक आहे. कारण या रुग्णांचे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढलेले असते, त्याशिवाय त्यांचा रक्तदाबही उच्च असतो.
या शास्त्रज्ञांनी टाइप टू मधुमेह झालेल्या काही रुग्णांवर अभ्यास केला. त्यांचे गट तयार करून त्यांच्याकडून सहा महिने व्यायाम करून घेतला. या रुग्णांसाठी दर आठवडय़ाला तीन विविध सत्रे आयोजित केली. एक सत्रात त्यांच्याकडून ‘स्पीनिंग क्लास’द्वारे आणि दोन सत्रात ‘एरोबिक्स’द्वारे कसरती करून घेतल्या. व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असे. या चाचणीत त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले जाई.
‘‘अधिक प्रमाणात व्यायाम करणे या रुग्णांना कठीण जात असे. पण तज्ज्ञांनी त्यांच्याकडून या कसरती करून घेतल्या त्याचा चांगला परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. व्यायामामुळे या रुग्णांचे वजनही घटले आणि त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाले. त्यामुळे टाइप टू मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे,’’ असे या संशोधकांच्या गटप्रमुख ओला हॅन्सन यांनी सांगितले.