Loose Motion Stomach Infection:बदलत्या हवामानामुळे नवीन ताजेपणा आणि आराम मिळतो, पण पावसाळ्यात पाणी साचणे आणि ओलसरपणामुळे अनेक जंतू, विषाणू लवकर वाढतात; त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि अनारोग्यदायी जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित आजार आणि इन्फेक्शन झपाट्याने वाढतात. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, कानपूर येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. साद अनवर यांच्या मते, चुकीच्या पद्धतीने बनवलेले अन्न, अस्वच्छता आणि दूषित पाणी हे धोकादायक जंतूंचे घर बनते. याचा परिणाम साध्या पोटदुखीपासून ते जीवघेण्या आजारापर्यंत होऊ शकतो. वेळेवर उपचार न केल्यास हे गंभीर आजाराचं कारण ठरू शकते.

लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वात जास्त धोका

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. साद अनवर यांच्या मते, दूषित अन्न आणि पाणी कोणतीही चिन्हे न दाखवता संसर्ग पसरवू शकतात. विशेषत: मुलं आणि वृद्ध यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्ग लवकर होतो, त्यामुळे बदलत्या हवामानात मुलं आणि वृद्ध यांची विशेष काळजी घ्यायला हवी.

अतिसार

पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाणी ई.कोलाई, साल्मोनेला आणि शिगेलासारखे जंतू पसरवू शकतात. त्यामुळे वारंवार जुलाब, उलटी, जोराचा ताप आणि पोटात तीव्र दुखणे होऊ शकते. कधी कधी हा संसर्ग रक्तापर्यंत जाऊन गंभीर समस्या निर्माण करू शकतो.

स्टमक फ्लू

व्हायरल गॅस्ट्रोएन्टेराइटिसला सोप्या भाषेत स्टमक फ्लू म्हणतात. नोरोव्हायरस आणि रोटाव्हायरससारखे विषाणू दूषित पाणी आणि अन्नातून पसरतात. यामुळे अचानक उलटीची भावना, पाण्यासारखे जुलाब आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते.

परजीवी संसर्ग

मान्सूनमध्ये दूषित पाणी आणि अन्नामध्ये जियार्डिया आणि एंटअमीबा हिस्टोलिटिकासारखे परजीवी आढळतात. हा संसर्ग बराच काळ टिकू शकतो, त्यामुळे सतत जुलाब होणे, पोट फुगणे, थकवा येणे आणि कुपोषण यांसारख्या समस्या होऊ शकतात.

फूड पॉयझनिंग आणि विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स)

काही सूक्ष्मजंतू खराब किंवा जास्त वेळ ठेवलेल्या अन्नामध्ये विषारी द्रव्ये तयार करतात. असे अन्न खाल्ल्याने लगेच फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्यामुळे जुलाब, उलटी आणि अशक्तपणा येऊ शकतो. वेळेवर उपचार न झाल्यास शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आणि पाण्याची कमतरता होऊ शकते.

वारंवार संसर्ग

पावसाळ्यात सतत दूषित अन्न किंवा पाणी घेतल्याने फक्त तीव्र संसर्गच होत नाही, तर आतड्यांची आवरणंही कमजोर होऊ शकतात. त्यामुळे पोषक तत्त्वांचे शोषण कमी होते. पुढे जाऊन इर्रिटेबल बाउल सिंड्रोम किंवा दीर्घकाळ पचनाच्या तक्रारींचा धोका वाढतो.