How to discipline child without hitting: प्रत्येक मुलाचा स्वभाव आणि विचारसरणी ही वेगवेगळी असते. मुलांचे विचार आणि वर्तन हे त्यांची जडणघडण कशी झाली यावर बहुतेकदा अवलंबून असते. मात्र, काही मुले मुळातच फार हट्टी असल्याची पालकांची तक्रार असते. लहान लहान गोष्टींवरून ते चिडतात, रागवतात आणि हट्टीपणा करू लागतात. मुलांचा अशा स्वभावामुळे पालक खूपच अस्वस्थ होतात. अनेक प्रयत्न करूनही मुल ऐकत नाही आणि हट्टीपणा करते ही अनेक पालकांची तक्रार असते. त्यांना हाताळणे पालकांसाठी अवघड होऊन जाते. मात्र तुमचे मूल जर अशाप्रकारे त्रास देत असेल तर पालकांनी थोडंसं विचारपूर्वक वागलंच पाहिजे. कारण मुलांना मारणं हा पर्याय अजिबातच योग्य नाही. म्हणूनच मुलाला समजूतदार बनवायचं असेल आणि त्याचा हट्टीपणा कमी करायचा असेल तर पालकत्वाच्या या टिप्स नक्की वाचा…
संयमाने काम करा
तुमचं मूल प्रत्येक लहान सहान गोष्टीवर हट्ट करत असेल, तर थोडा धीर धरा. मुलांनी हट्टीपणा केला आणि तुम्ही रागावलात तर परिस्थिती आणखी बिकट होते. अशा परिस्थितीत तुमच्या शांत आणि संयमी वृत्तीचा मुलावर सकारात्मक परिणाम होईल. तुम्ही समजवून सांगू शकता की प्रत्येक गोष्टीवर हट्ट करणं योग्य नाही. त्यामुळे तुमचं मूल हळूहळू का होईना समजूतदारपणा नक्की दाखवेल.
नकारात्मक गोष्टी टाळा
मुलांसमोर नकारात्मक बोलणं टाळा. यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. परिणामी ते स्वत:ला कमी दर्जाचं लेखू शकतात. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमीच सकारात्मक संवादाचा वापर करा.
मुलांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका…
अनेकदा मुलांना बरंच काही सांगायचं असतं, पण जेव्हा त्यांचं ऐकून घेण्यासाठीच कोणी नसतं तेव्हा ते आतमधून शांत होतात. अशावेळी जेव्हा पण मुलांना तुमच्याशी काही शेअर करायचं असेल तेव्हा आवर्जून वेळ काढून त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून आणि समजून घ्या.
मुलांना ऑर्डर देऊ नका
तुम्ही कितीही कामात असलात तरी मुलांना आदेश देणं कधीही टाळा. त्यामुळे ते अधिक रागावू शकतात. तुम्ही जर त्यांना दोन किंवा तीन पर्याय दिले तर त्यांना असं वाटेल की, ते स्वत: निर्णय घेत आहेत. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल आणि तुमचं म्हणणं ते सकारात्मकतेने ऐकूनही घेतील.
दिनचर्या तयार करा
मुलांच्या सवयी सुधारण्यासाठी दिनचर्या अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये त्यांच्या अभ्यासापासून ते जेवणापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ निश्चित करा. यामुळे मुलांना शिस्त लागेल. शिवाय त्यांच्या प्रत्येक कामात शक्य असल्यास सहभाग घ्या, यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल.