काखेतील अनावश्यक केस काढणे खूप कठीण काम असते. तरीही ते वेळोवेळी काढून टाकणे फार महत्त्वाचे असते; अन्यथा ते त्वचेचे संक्रमण, पुरळ व मुरुम यांचे कारण ठरू शकतात. त्याशिवाय या केसांमुळे घामाचा खूप वास येतो. काखेतील केस काढणे गरजेचे असते. काखेतीस केस कोणत्याही दिशेला वाढतात. त्यामुळे रेझर प्रत्येक दिशेला फिरवून शेव्हिंग करताना त्वचा कापण्याचा धोका वाढतो. त्यात काखेतील त्वचा फार नाजूक असते. त्यामुळे छोट्याशा चुकीनेही त्वचा कापून खूप रक्तस्राव होऊ शकतो.
जर तुम्हीही रेझरने काखेतील केस काढत असाल, तर खालील चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत; ज्यामुळे तुम्ही सहजपणे केस काढू शकता.
१) रेझरने अशा प्रकारे काढा काखेतील केस…
जर तुम्ही रेझरने काखेतील केस काढत असाल, तर त्याआधी काख साबणाने स्वच्छ धुऊन कोरडी करा. आता काखेत पुन्हा बॉडी वॉश लावा; जेणेकरून फेस तयार होईल. आता केसांच्या वाढीच्या दिशेने रेझर फिरवा. रेझर नीट न वापरल्यास त्वचेवर ओरखडे येऊ शकतात किंवा त्वचा कापली जाऊन रक्तस्राव होऊ शकतो.
२) मल्टीब्लेड रेझर वापरू नका
बाजारात अनेक प्रकारची रेझर उपलब्ध आहेत. काखेतील केस काढायचे असतील, तर मल्टीब्लेड रेझर वापरू नका. मल्टीब्लेड रेझरने काखेतील केस खूप खोलवर काढले जातात. या रेझरच्या वापराने त्वचा कापली जाण्याचीही भीती असते. इतकेच नाही, तर काखेत केस फोड येण्याची भीती असते.
३) जुना रेझर वापरू नका
जर तुम्हाला रेझरने काखेतील केस काढायचे असतील, तर जुना रेझर वापरू नका. जुन्या रेझरची तीक्ष्णता कमी झालेली असते. अशाने केस मुळांपासून सहज काढता येत नाहीत आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. कोणताही रेझर १० पेक्षा जास्त वेळा वापरू नका.
४) करून पाहा ‘हे’ उपाय
काखेतील केस काढण्यासाठी तुम्ही वॅक्सची मदत घेऊ शकता. वॅक्सिंग ही केस काढण्याच्या सर्वसामान्य पद्धतींपैकी एक आहे. तुम्ही घरी किंवा सलूनमध्ये वॅक्सिंग करू शकता. वॅक्सिंग ही थोडी त्रासदायक प्रक्रिया आहे; पण वॅक्सने केस काढल्याने केसांची वाढ हलकी होते आणि केस पुन्हा वाढण्यास जास्त वेळ लागतो.