एप्रिल सुरू झाला असून, उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. कडक उन्हापासून वाचण्यासाठी लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळताना दिसतात. अशा स्थितीत वीज बिलात वाढ होणे स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात एसी आणि कूलरच्या अधिक वापरामुळे वीज बिलात वाढ होते. त्यामुळे खिशावरचा आर्थिक भार वाढतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुमचे दर महिन्याचे वीज बिल २०-३० टक्क्यांनी कमी येईल.
डिजिटल कंटेंट क्रिएटर शशांक आल्शी याने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने अशा काही ट्रिक्स सांगितल्या आहेत; ज्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा फक्त ‘या’ ट्रिक्स
१) कोणत्याही उपकरणाचा मेन स्विच बंद करा
शशांकच्या मते, तुमच्या घरातील कोणतेही उपकरण जसे की वॉशिंग मशीन, टीव्ही, सेटअप बॉक्स किंवा पंखा इत्यादी मेन स्विचवरूनच बंद करा. रिमोट किंवा बटण इत्यादी वापरून बंद होणारी उपकरणं अनेकदा वीज खेचू शकतात. त्यामुळे ते वापरात नसतानाही त्याचे बिल येऊ शकते. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही ही सर्व उपकरणं वापरत नसाल तेव्हा मेन स्विचवरून ती बंद करा.
२) एसीच्या टेम्परेचरकडे लक्ष द्या
उन्हाळ्यात एसीचे टेम्परेचर नेहमी २४ ते २६ अंश सेल्सिअस ठेवावे. त्यामुळे कूलिंग चांगल्या प्रकारे होते आणि जास्त वीजही लागत नाही. ‘लक्षात ठेवा टेम्परेचर जितके कमी कराल तितकी वीज जास्त वापरली जाईल आणि बिल जास्त येईल. त्यामुळे तुम्ही चांगल्या परिणामांसाठी टायमर सेट करू शकता.
३) एलईडी बल्बचा वापर करा
विजेचे बिल कमी करण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या फिलामेंट बल्बच्या जागी एलईडी बल्बचा वापर करा. १० वॉटचा फिलामेंट बल्ब १० तासांत एक युनिट वीज वापरतो; तर हीच एक युनिट वीज वापरून एक एलईडी बल्ब १११ तास चालू शकतो. हे लक्षात घेऊन, फिलामेंट बल्बच्या जागी एलईडी बल्ब लावून तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता.