5 Foods You Should Never Refrigerate : हल्ली प्रत्येकाच्या घरी फ्रिज असतो, ज्यात थंड पाणी आणि बर्फासाठी विविध बाटल्या, ट्रे ठेवतो. त्याशिवाय अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या, मसाले, ज्यूसशिवाय काही लोक कडधान्यदेखील फ्रिजमध्ये ठेवतात. अन्नपदार्थ खराब न होता, सुरक्षितरीत्या टिकण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो.

सकाळची भाजी आपण संध्याकाळपर्यंत फ्रिजमध्ये ठेवून रात्रीच्या जेवणात खातो. त्यात ऑफिसला जाणाऱ्या महिला खरेदी केलेला आठवडाभराचा भाजीपाला फ्रिजमध्ये साठवतात, जेणेकरून वेळ आणि गरजेनुसार त्या भाज्या लगेच बनवता येतील. पण, तुम्हाला माहीत आहे का, असे काही पदार्थ आहेत, जे फ्रिजमध्ये ठेवणं अजिबात सुरक्षित नाही.

काही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव, त्यातील पोषक घटक यांवर परिणाम होतो. तसेच, ते पदार्थ खाल्ल्यास आपल्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हे पदार्थ तुमच्या पोटात गेल्यास विषाचे काम करतात.

याबाबत यूएस बोर्ड सर्टिफाइड ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी के गुप्ता यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून खाल्ल्यास, त्यामुळे तुमचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल. त्यात विषारी जीवाणू वाढू लागतात, ज्यामुळे अन्न विषारी बनू शकते. नेमके कोणते पदार्थ फ्रिजमध्ये साठवून खाल्ल्यास शरीरावर त्याचा विषासारखा परिणाम होतो, ते पदार्थ जाणून घेऊ…

हे’ ५ पदार्थ फ्रिजमध्ये साठवून खाल्ल्यास आरोग्यावर होईल परिणाम (5 Foods That Should Never Be Put In The Refrigerator)

१) कापलेला लिंबू

जर तुम्हाला अर्धा लिंबू वापरण्याची आणि उरलेला लिंबू फ्रिजमध्ये तसाच ठेवण्याची सवय असेल, तर ही सवय बंद करणे महत्त्वाचे आहे. लिंबू कापल्यानंतर त्यातील व्हिटॅमिन सीचे हळूहळू ऑक्सिडायजेशन होऊ लागते, ज्यामुळे त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. जर कापलेला लिंबू जास्त काळ तसाच फ्रिजमध्ये ठेवला, तर आर्द्रतेमुळे त्यात बुरशीची वाढ किंवा जीवाणू वाढू लागतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा लिंबूचे सेवन केल्यास पचन समस्या किंवा संसर्ग होऊ शकतो. म्हणून कापलेला लिंबू हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या रॅपरमध्ये फक्त काही तासांसाठी ठेवू शकता. पण, गरजेनुसारच लिंबू कापून ताजे वापरणे चांगले.

२) पनीरची भाजी

जर तुम्हालाही तुमचे आवडते पनीर किंवा पनीरची भाजी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवण्याची आणि नंतर खाण्याची सवय असेल, तर ही सवय बदलणे गरजेचे आहे. पनीर प्रोटीनयुक्त पदार्थ आहे; पण त्याला लगेच पाणी सुटते. त्यामुळे पनीर किंवा पनीरची भाजी जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात हानिकारक जीवाणू वेगाने वाढू शकतात. विशेषतः पनीरच्या ग्रेव्हीयुक्त भाजीमध्ये बॅसिलस सेरियससारखे जीवाणू वाढू लागतात, ज्यामुळे विषबाधा, उलट्या व जुलाब होऊ शकतात. म्हणून पनीरची भाजी जास्तीत जास्त १-२ दिवस फ्रिजमध्ये ठेवा आणि खाण्यापूर्वी ती चांगली गरम करा. आरोग्यासाठी ताजे पनीर खाणे फायदेशीर आहे.

३) कापलेली फळे

कापलेली फळे जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवणे ही एक वाईट सवय आहे, जी बदलणे आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक पपई, टरबूज व आंबा यांसारखी फळे कापून अनेक तास फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात; परंतु असे करणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. फळे कापल्यानंतर त्या फळांमध्ये असलेले फ्रुक्टोज आणि इतर पोषक घटक हळूहळू ऑक्सिडाइझ होऊ लागतात, ज्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात आणि त्यांची चव व गुणवत्तादेखील खराब होते. तसेच कापलेली फळे फ्रिजमध्ये उघडी ठेवल्याने त्या फळांमध्ये जीवाणू किंवा बुरशी वाढू शकते.

४) उघडा ब्रेड

जर तुम्ही ब्रेड फ्रिजमध्ये तसाच उघडा ठेवून आठवडाभर खात असाल, तर ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जरी तुम्हाला ब्रेडवर कोणत्याही प्रकारची बुरशी दिसत नसली तरी फ्रिजच्या आर्द्रतेमुळे त्यावर सूक्ष्म बुरशी वाढू लागते, जी सुरुवातीच्या टप्प्यात डोळ्यांना दिसत नाही; पण काही तासांनी ब्रेडवर काळे डाग दिसू लागतात, विशेषतः ब्राउन ब्रेडमध्ये जास्त ओलावा आणि फायबर असते. अशा ब्रेडचे सेवन केल्याने पोटाचे विकार, गॅस, अपचन किंवा विषबाधा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून नेहमी ब्रेडचे लहान पॅकेट खरेदी करा. ते कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवा आणि तीन ते चार दिवसांच्या आत खा. जर ब्रेडला बुरशी किंवा वास येत असेल, तर तो ताबडतोब फेकून द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) उघडलेलं दह्याचं पॅकेट

बऱ्याचदा काही लोक फ्रिजमध्ये दही महिनोन महिने साठवतात आणि वापरतात; पण तुम्हाला माहिती आहे का की, असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर उघडलेल्या पॅकेटमधील दही जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवले, तर त्यात ऑक्सिडायजेशन होऊ लागते. त्यामुळे त्याचा वास, चव आणि पोषण घटकांवर परिणाम होतो. त्याशिवाय जर दही बराच काळ फ्रिजमध्ये उघडे राहिले, तर फ्रिजमधील इतर गोष्टींचा वासदेखील ते शोषून घेते आणि त्यात जीवाणू किंवा बुरशी वाढू शकते. असे दही खाल्ल्यास पचन समस्या, गॅस किंवा विषबाधा होऊ शकते. म्हणून नेहमी दही बंद डब्यात ठेवा आणि ते दोन-तीन आठवड्यांच्या आत वापरा. मीठ न घातलेले दही लवकर खराब होऊ शकते, तर मीठ घातलेले दही काही काळ टिकू शकते. परंतु, स्वच्छता आणि साठवणुकीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.