‘अती तेथे माती’ अशी म्हण आहे. वजन कमी करण्याच्याबाबतीत अनेकांचे काहीसे असेच होते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप मेहनत घेतात. मात्र उत्साहाच्या भरात ते अशा काही चुका करतात की त्याने वजन कमी होण्याऐवजी वाढते. त्यामुळेच आज बोलूयात अशाच काही गोष्टींबद्दल. तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असल्यास तर या खास बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेणे करुन तुम्ही घेत असलेल्या काष्टांचा योग्य परिणाम साधता येईल.

क्रॅश डायटिंग
वजन कमी करण्याची सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे क्रॅश डायटिंग. वजन कमी करणाऱ्यांच्या डोक्यात सर्वात आधी येणारा हा मार्ग खरं तर तुमचे वजन वाढवतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र अचानक आहारामधील महत्वाच्या घटकांचे सेवन कमी केल्याने शरिराची हानी होते. ठराविक पदार्थ अन्नातून वर्ज्य केल्याने मेटाबॉयोलिझम कमी होते आणि त्यामुळे वजन वाढते.

पौष्टिक पदार्थ जास्त खाणे
डायटिंग करताना पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जास्त पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने वजन पटापट कमी होईल असा अनेकांचा समज होतो. त्यामुळेच पौष्टीक अन्नाच्या नावाखाली गरजेपेक्षा जास्त खाणे होते. अतीसेवन केलेल्या या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. एव्हॅगॅडो हे पौष्टीक फळांपैकी एक आहे. मात्र त्यामध्ये भरपूर कॅलरी असतात हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून पौष्टीक पदार्थ खातानाही त्यावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे.

जास्त व्यायाम करणे
वजन कमी करण्याचा सर्वात मेहनती मार्ग म्हणजे व्यायाम. जीमला जण्यास सरुवात करणे, धावायला जाणे यासारखा बऱ्याच प्रकारचा व्यायाम अनेकजण सुरु करतात. अनेकदा पटापट वजन कमी करण्याच्या उद्देशाने लोक गरजेहून आणि स्वत:च्या क्षमेतेहून अधिक व्यायाम करतात. मात्र जास्त व्यायाम केल्याने जास्त खाणे होते. व्यायाम करुन अधिकचा आहार घेतला तरी वजन वाढत नाही असा एक गैरसमज आहे. मात्र हे खोटं असून व्यायामाला योग्य आहाराची जोड हवीच. म्हणूनच जीममधील प्रशिक्षक किंवा जाणकारांच्या सल्ल्यानेच व्यायामाचे नियोजन केलेले फायद्याचे ठरते.

जास्त कॅलरी असणारे रस
अनेकदा वजन कमी करण्यासाठी खाद्यापदार्थांऐवजी वेगवेगळ्या भाज्यांचा आणि फळांच्या रसाला प्राधान्य दिले जाते. मात्र या रसांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप अधिक असते. कॉफी, चहा, स्मुदी, मिल्कशेक अशा दैनंदिन पेयांमधील आणि पौष्टीक रसांमध्ये भरपूर कॅलरीज् असतात. एक ग्लास पेयात अंदाजे ३०० ते ६०० कॅलरी असतात. म्हणूनच असंबंध आणि एकांगी आहार घेत राहिल्यास पोट कमी होण्याऐवजी वाढते.

रोज वजन तपासणे
वजन कमी करणाऱ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे रोज वजन तपासून पाहणे. रोज वजन कमी होत नाही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे रोज वजन तपासत राहिल्यास फस्ट्रेशन येते आणि वजन कमी होत नाही असं वाटून अनेकजणांचा उत्साह कमी होतो ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होऊन बसते. आठवड्यातून एकदाच वजन तपासून पाहणे योग्य असते.