Three Posture Mistakes To Avoid: नियमित आयुष्यात सतत घाई गडबड असताना आपण अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत असतो. पण अनेकदा स्वतःकडेच दुर्लक्ष होते. थोडक्यात आपण ज्या प्रकारे बसतो, उभे राहतो आणि हालचाल करतो त्याचा आपल्या आरोग्यावर आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम होतो. दुर्दैवाने, आपल्यापैकी बरेच जण हे लक्षात न घेता अनेकदा चुका करतात. अलीकडेच, माइंडफुल मूव्हमेंट प्रॅक्टिशनर आणि पिलाटीस ट्रेनर नम्रता पुरोहित यांनी इन्स्टाग्रामवर तीन चुका शेअर केल्या आहेत ज्या आपण कोणत्याही परिस्थितीत टाळल्या पाहिजेत. यामुळे शरीरात वेदना होऊ शकतात असे सांगताना त्यांनी प्रत्येकाने या चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात हे सुद्धा समाजवले आहे.

१) एक पाय दुसऱ्यावर ठेवणे

FITTR, चे फिटनेस ट्रेनर, उत्सव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, बसलेल्या स्थितीत एक पाय दुसऱ्यावर टाकून बसल्याने पेल्विक हाडांवर दबाव येऊ शकतो. यामुळे मणक्यावर ताण येऊन कंबरेच्या भागात वेदना होऊ शकतात. या स्थितीत दीर्घकाळ बसल्याने अस्वस्थता जाणवू शकते, विशेषत: पाठीच्या खालच्या भागात, नितंब आणि ओटीपोटात दुखण्याचा त्रास होतो. हे सायटिका सारख्या समस्यांमध्ये देखील योगदान देऊ शकते किंवा अगोदरच असा त्रास असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

२) पोटावर झोपणे

अग्रवाल यांनी नमूद केले की, जेव्हा तुम्ही पोटावर झोपता तेव्हा श्वास घेण्यासाठी तुमचे डोके एका बाजूला वळवावे लागते. यामुळे मान दीर्घकाळ दुखून ताण वाढू शकतो. यामुळे पाठीचा खालच्या भागात बाक येऊ शकतो, ज्यामुळे कंबरेच्या मणक्यावर आणि जवळच्या स्नायूंवर ताण निर्माण होतो. या व्यतिरिक्त, अग्रवाल म्हणाले की, ही स्थिती नैसर्गिक श्वासोच्छवासाच्या पद्धतींमध्ये अडथळा घालू शकते आणि छाती आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव आणू शकते, ज्यामुळे श्वसनाच्या कार्यावर परिणाम होतो.

3) मान सतत फिरवणे आणि क्रॅक करणे

अनेकांना बोटं मोडण्याची सवय असते किंवा सतत मान फिरवून क्रॅक करण्याची सवय असते. यामुळे काही प्रमाणात तात्पुरता आराम मिळत असला तरी दीर्घकालीन दुखापत होऊ शकते. जर आपल्याला अशा प्रकारे मानेचे व्यायाम करायचेच असतील तर त्यासाठी योग्य पद्धत वापरायला हवी. अन्यथा मणक्यातील नाजूक संरचनांना दुखापत होऊ शकते.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जर तुम्हाला अगोदरच एखादी आरोग्य स्थिती असेल, जखम झालेली असेल, तर व्यायामासह नियमित वावरताना, बसताना सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे. यासाठी तुमचे पोश्चर कसे असावे हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.