Mango Health Benefits : ‘फळांचा राजा’ आंबा हे उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचे फळ. उन्हाळा सुरू झाल्यापासून पावसाळ्यापर्यंत अनेक प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे मार्चपासूनच लोक रसाळ, मधाळ आंबे चाखताना दिसतात. चवीपलीकडे आंब्यांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण, मधुमेह, लठ्ठपणासारख्या आजारांनी ग्रस्त असलेले लोक आंबा खाण्यास घाबरतात. कारण- आंबा खाल्याने वजन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, अशी चिंता त्यांना सतावते. याच विषयावर प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट असलेल्या ऋजुता यांनी उन्हाळ्यात दररोज एक आंबा खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते असे म्हटले आहे.
न्यूट्रिशन एक्स्पोर्ट ऋजुता दिवेकर म्हणाल्या की, ताजे आंबे खाल्ल्याने मधुमेह होतो याचा कोणताही पुरावा नाही. एवढेच नाही, तर दररोज एक आंबा खाल्ल्याने तुमचे वजन वाढते याबाबतही कोणताही पुरावा नाही. याउलट आंब्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स व पॉलीफेनॉलचे प्रमाण अधिक असते; ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील असू शकतात.
ऋजुता यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत सांगितले, “हा व्हिडीओ तुम्हाला दरवर्षी उन्हाळा आला की, तुम्ही दररोज एक आंबा खावा याची आठवण करून देण्यासाठी आहे.
आंब्यामुळे मधुमेह होत नाही. लठ्ठपणा येत नाही किंवा मुरमेही येत नाहीत. आंबा खाण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात भिजवा आणि नंतर तो खा. आंबे स्वादिष्ट, गोड तर असतातच; पण त्यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स व पॉलीफेनॉल असते. तुम्ही जे काही वेलनेस प्रॉडक्टसमध्ये शोधता, ते तुम्हाला या नैसर्गिक फळातून मिळते.
चुकीची माहिती हानिकारक; आंबा नाही.
ऋजुता दिवेकर यांनी म्हटले की, आंबा हे असे एक फळ आहे, की ज्याच्या हंगामाची लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. आपण आंबा नैसर्गिकरीत्या पिकण्याची वाट पाहतो. नंतर तो कापतो आणि त्याची चव, रस व सुगंधाचा आनंद घेतो. आंबा खाण्याचा हा आनंद घेण्यापासून तुम्ही दूर राहू नका. कारण- रोज आंबा खाल्ल्याने तुम्हाला आनंद मिळतो, जो आजच्या काळात आपल्या सर्वांनाच हवा आहे. अमेरिकन डायबेटिक असोसिएशनदेखील हंगामात आंबे खाण्याची शिफारस करते.