How to quit smoking: अगदी कमी वयापासूनच तरूण-तरूणींनी धूम्रपान करण्याची सवय लागते. काही जण जण छंद म्हणून धूम्रपान करायला सुरूवात करतात, तर काही जण स्टेटस जपण्यासाठी ही सवय लावून घेतात. धूम्रपान हे एक असं व्यसन आहे जे माणसाला हळूहळू आतून पोखरू लागतं.
काही जण धूम्रपानाच्या आहारी गेले असले तरी, ते त्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्नही करतात. बऱ्याचदा असं काही जण म्हणतात की, मला धूम्रपान सोडायचे आहे पण मला ते शक्य होत नाही. कारण ही सवय एकाच झटक्यात सोडता येत नाही. पण जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले, काही गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरूवात केली तर ते तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतील.
धूम्रपान सोडणे काहींना कठीण का जाते?
युनिव्हर्सिटी ऑफ लिसेस्टरमध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, सिगारेटचे व्यसन सोडण्यात मानवी जनुके (जीन्स) महत्त्वाची भूमिका बजावतात. या जनुकांच्या मदतीने धूम्रपानविरोधी औषधे माणसांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. एवढंच नाही तर, ते धूम्रपानाची तीव्र इच्छा कमी करण्यासही मदत करतात.
धूम्रपान सोडण्याचे सोपे मार्ग
धूम्रपान सोडायचे असेल तर त्यावर आधी नियंत्रण मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जेव्हा धूम्रपान करायचे असेल तेव्हा निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधे घेऊ शकता. अचानक धूम्रपान सोडल्याने मानसिक आणि शारीरिक ताण येऊ शकतो. त्यामुळे उलट अधिक प्रमाणात धूम्रपान करण्याची इच्छा होऊ शकते. म्हणूनच धूम्रपानाची सवय हळूहळू कमी करा.
धूम्रपान थांबवण्यासाठी ते करण्याची इच्छा का होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काही जण तणावात असताना धूम्रपान करतात तर काही लोक जेवल्यानंतर धूम्रपान करतात. हे ओळखा आणि त्या वेळा टाळण्याचा प्रयत्न करा. तणावात असताना धूम्रपान करण्याची इच्छा होत असेल तर तुमचं मन एखाद्या दुसऱ्या गोष्टीकडे वळवा.
धूम्रपानाचे व्यसन कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय
धूम्रपान कमी किंवा सोडायचे असल्यास सर्वात योग्य आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही योग आणि ध्यान करावे. तुमच्या दिनचर्येत सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करा. मन कुठल्या ना कुठल्या गोष्टीत गुंतून राहील हे बघा. व्यायाम करा आणि आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.