५०० किमी ई-कारची अखंडित धाव

कारच्या बाबतीत भारतात पाच ते सहा पर्याय उपलब्ध होते.

बापू बैलकर

* विद्युत वाहननिर्मितीत जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचे भारतात आगमन झाले असून त्यांनी बेंगळूरु येथे आपले उत्पादन सुरू केले.

* ‘एमजी मोटर’ने आपली झेडएस ईव्ही कार सुधारित स्वरूपात बाजारात आणली असून तिची क्षमता एका चार्जिगमध्ये ४१९ किलोमीटपर्यंत आहे.

* जग्वार लँड रोव्हरने बुधवारी अधिकृत घोषणा करीत त्यांची जग्वार आय-पेस या ई-कारची घोषणा केली असून ती ९ मार्च रोजी भारतात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

विद्युत कार निर्मितीत हा घटनाक्रम महत्त्वाचा असून कोणतेही प्रदूषण नाही.. एकदा चार्ज केले की १०० ते ५०० किलोमीटपर्यंत चिंता नाही.. कसलाही आवाज नाही.. वाहनांच्या वेगावर स्वयंचलित नियंत्रण.. गाडी चालवताना कसलाही त्रास नाही.. गतीही ताशी १२० ते १५० किलोमीटपर्यंत.. ही भारतीय वाहन खरेदीदारांनी पाहिलेली स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. किमतीच्या बाबतीत अद्याप ती परवडणारी आहे, असे म्हणता येणार नाही, मात्र इंधनावरील वाहनांच्या तुलनेत विद्युत कार किती तरी पटीने परवडणारी आहे.. अगदी एक रुपयात एक किलोमीटपर्यंतचा प्रवास.. होय, आता हे शक्य होणार आहे..

टेस्ला.. ही अमेरिकेतील विद्युत कार उत्पादन करणारी कंपनी असून गेल्या काही दिवसांत जगाचे लक्ष तिने आपल्याकडे वेधले आहे. या कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरू करणे ही अतिशय मोठी घटना असून या कंपनीच्या  टेस्ला मॉडेल ३, टेस्ला मॉडेल एस व टेस्ला मॉडेल एक्स या तीन कार सध्या जगात कारप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. यातील टेस्ला मॉडेल ३ ही त्यातल्या त्यात कमी किमत असलेली कार प्रथम भारतीय बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कार अगदी १५ मिनिटांत पूर्ण चार्ज होत असून ती ५०० किलोमीटपर्यंत धावू शकते. तसेच गाडीचा सर्वाधिक वेग हा १६५ पर्यंत आहे. भारतात येणारी कार कशी असेल हे अद्याप कंपनीने जाहीर केले नसले तरी कारची ही वैशिष्टय़े पाहता त्यामुळे भारतात विद्युत कारमध्ये नक्कीच स्पर्धा निर्माण करू शकेल.

एमजी मोटर इंडियाने नवी झेडएस ईव्ही २०२१ ही २०.९९ लाख रुपये किमतीत (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) प्रदर्शित केली आहे. या सुधारित कारमध्ये सर्वोत्तम वर्गात ४४.५ किलोवॉटची हाय टेक बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यास ४१९ किलोमीटरचे अंतर पार करेल. कारचे जमिनीपासूनचे अंतर १७७ मिमी इतके असल्याने ही कार खराब रस्त्यांवरही धावू शकेल. ही कार १४३ बीएचपीची ताकद आणि ३५०न् यूटन मीटरचे टॉर्क देते. तसेच ती ८.५ सेकंदात १०० पर्यंतचा वेग गाठू शकते.

जग्वार लँड रोव्हरने आपल्या जग्वार आय-पेस या बॅटरीवरील एसयूव्हीची अधिकृत घोषणा केली ती असून ९ मार्च २०२१ रोजी भारतामध्ये सादर करण्यात येणार आहे. पदार्पणापासून आय-पेसने ८० हून अधिक जागतिक पुरस्कार जिंकले आहेत. २०१९ मध्ये एकाच वेळी तिन्ही वर्ल्ड कार टायटल्स जिंकणारी ही पहिली कार ठरली आहे. जग्वार ही कार ४६.६४ लाख रुपयांपासून ९५.१२ लाखांपर्यंत उपलब्ध करून देणार असून त्याची नोंदणी सुरू केली आहे. या कारची क्षमता एकदा चार्ज केल्यानंतर ४८० किलोमीटपर्यंत असेल.  या कारमध्ये ३९४ बीएचपीची ताकद असून ती ६९६ इतका यूटन मीटरचे टॉर्क देते.  ती ४.८ सेकंदात १०० किलोमीटर प्रतिघंटा हा वेग पकडते. ९० किलोवॉट क्षमतेची  लिथियम बॅटरी दिली असून ४५ मिनिटांत ८० टक्केपर्यंत ती चार्ज होऊ शकते.

हा घटनाक्रम भारतात बॅटरीवर चालणाऱ्या विद्युत कारच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असून यावर विद्युत कारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आतापर्यंत भारतात विद्युत कार निर्मितीत कार उत्पादक कंपन्यांनी फारसा सहभाग नोंदवला नव्हता, मात्र २०२१ हे वर्षे महत्त्वाचे असेल असे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या वाहन प्रदर्शनात आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या विद्य्रुत कारचे दर्शन घडवले होते, मात्र त्या बाजारात उतरवताना सावध भूमिका घेतली होती, मात्र आता याला गती मिळताना दिसत आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या भारतातील आजच्या स्थितीवर नजर टाकली असता दुचाकी दहा ते बारा ते सहा लाख, तीनचाकी पाच लाखांपर्यंत निर्मिती गेली असेल, मात्र कारच्या बाबतीत भारतात पाच ते सहा पर्याय उपलब्ध होते. त्यात बॅटरीची क्षमता कमी असल्याने त्यांची धाव जास्तीत जास्त शहरांतर्गत वाहतुकीपर्यंत होती. पायाभूत सुविधा नसल्याने शहराबाहेर प्रवास शक्य होत नव्हता. मात्र यापुढील काळात येऊ घातलेल्या कार पाहता त्या शहराबाहेरही धावताना दिसतील.

टाटा नेक्सन

’ क्षमता : ३१२ किलोमीटपर्यंत

’ बॅटरी : ३६.२ किलोवॉट

’ आकार : लांबी ३९९४ मिमी, रुंदी १८११ मिमी, उंची १६०७ मिमी

’ अश्वशक्ती : ९५ किलोवॉट

’ टॉर्क : २४५ एनएम

टाटा टिगोर

’ क्षमता : २१३  किलोमीटपर्यंत

’ बॅटरी : २१.५ किलोवॉट

’ आकार : लांबी ३९९२ मिमी, रुंदी १६७७ मिमी, उंची १५३७ मिमी

’ अश्वशक्ती : ३० किलोवॉट

महिंद्रा ई वेरिटो

’ क्षमता : १८१ किलोमीटपर्यंत

’ बॅटरी : २१.२१ किलोवॉट

’ आकार : लांबी ४२२७ मिमी, रुंदी १७४० मिमी, उंची १५४० मिमी

ह्य़ुंदाई कोना

’ क्षमता : ४५२ किलोमीटपर्यंत

’ बॅटरी : ३९.२ किलोवॉट

’ आकार : लांबी ४१८० मिमी, रुंदी १८ मिमी, उंची १५७० मिमी

’ अश्वशक्ती : १०० किलोवॉट

बॅटरी बॅकअप

बॅटरीवर चालणाऱ्या कारसाठी चार्जिग स्टेशन ही अतिशय महत्त्वाची सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र भारतात अद्याप दखल घ्यावी एवढी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे कार उत्पादक कंपन्यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी करार करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाच्या शहरांत आपली अतिजलद चार्जिग केंद्रे

उभारली आहेत. ‘एमजी मोटर’ने ही महत्त्वाची समस्या लक्षात घेत चार्जिगसाठीच्या पाच महत्त्वाच्या सुविधा पुरवत चालकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यात घर किंवा ऑफिसमध्ये मोफत एसी फास्ट चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिग केबल, डीलरशिपसाठी डीसी सुपरफास्ट चार्जिग स्टेशन, चार्ज-ऑन-द-गो सुविधा (५ शहरांमध्ये) व सॅटेलाइट शहर तसेच पर्यटन केंद्रांमध्ये चार्जिग स्टेशन उभारण्याची घोषणा केली आहे. यामुळे कार आपण रात्री घरी असताना चार्जिग करू शकतो. ही सुविधा मोबाइलवर ऑपरेट करता येते. जर प्रवासादरम्यान चार्जिग संपले तर कंपनीची ‘चार्जिग व्हॅन’ त्या ठिकाणी येत किमान ३० किलोमीटपर्यंत कार जाईल इतकी चार्जिग करून देईल. त्यामुळे प्रवास सुलभ होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Electric vehicles articles electric vehicle benefits zws