Urine Eye Wash Video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात आरोग्य आणि फिटनेसबद्दलही खूप वेगवेगळे ट्रेंड्स व्हायरल होतात. त्यापैकी काही उपयोगी असतात, काही फक्त व्ह्युज आणि लाइक्ससाठी केलेला एक प्रयोग असतो, तर काही व्हिडीओ बघायलाच अगदी विचित्र वाटतात. असाच एक धक्कादायक ट्रेंड अलीकडेच इंस्टाग्रामवर पाहायला मिळाला.

पुण्यातील “मेडिसिन-फ्री लाइफ कोच” नूपुर पिट्टी यांनी इंस्टाग्रामवर एक विचित्र व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या स्वतःच्या लघवीने डोळे धुताना दिसतात. त्या म्हणतात की यामुळे डोळ्यांचा लालसरपणा, कोरडेपणा आणि जळजळ कमी होते. पिट्टी म्हणतात की हे त्यांच्या नैसर्गिक उपचार पद्धतीचा एक भाग आहे.

“युरिन आय वॉश – नेचर ओन मेडिसिन” या नावाच्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे आणि लोकांनी त्यावर जोरदार टीका केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या क्लिपमध्ये पिट्टी सांगतात की त्या सकाळच्या वेळची ताजी लघवी डोळे धुण्यासाठी वापरतात. जरी त्या याला एक पर्यायी उपाय म्हणून सांगतात, तरी डॉक्टरांनी या प्रकाराविरुद्ध कठोर इशारा दिला आहे.

नेत्रतज्ज्ञांनी दिला इशारा (Eye Wash with Urine)

व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. समिता मुलानी यांनी २७ जून रोजी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, सकाळची लघवी पूर्णपणे स्वच्छ नसते. त्यामुळे कधीही लघवीने डोळे धुण्याची चूक करू नका, कारण लघवी sterile (जंतुरहित) नसते. हा उपाय धोकादायक ठरू शकतो.

डोळ्यांची काळजी घेण्याचा योग्य मार्ग (Take care of Eyes)

डॉ. समिता मुलानी पुढे म्हणाल्या की, आजकाल लोकांना काय झालंय काय माहिती, कोणताही व्हिडिओ ते शेअर करतात. त्यांच्या मते, डोळे आपोआप स्वच्छ होतात. त्यांना आतून स्वच्छ करण्यासाठी काहीच लागत नाही. त्यांनी सांगितले की जर कोणाच्या डोळ्यात कोरडेपणा असेल, तर योग्य उपचार म्हणजे Preservative-free, Sterile आणि lubricating आय ड्रॉप्स वापरणे. डॉ. समिता म्हणाल्या की पापण्या आणि पापण्यांभोवतीचा भाग पाण्याने धुणे चांगली गोष्ट आहे आणि जे लोक मेकअप करतात, त्यांनी डोळ्यांसाठी सुरक्षित वाइप्स वापरावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.