फेसबुक कायमच नवनीवन फिचर्स आणून आपल्या यूजर्सना खूश करत असते. आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल करत असल्याने नेटीझन्सची या साईटला मोठी पसंती असल्याचे दिसते. फेसबुक मेसेंजरही युजर्समध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. याच मेसेंजरवर एक नवीन फिचर लाँच करत असल्याचे फेसबुककडून नुकतेच सांगण्यात आले. एका वर्षापूर्वी फेसबुकने याच लाईव्ह चॅट अँप्लिकेशनच्या माध्यमातून इन्स्टंट गेम्स हा प्लॅटफॉर्म लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ चॅटिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे या माध्यमातून गेम खेळणाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधणे सोपे होणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सध्या जवळपास २४. ५ कोटी यूजर्स दर महिन्याला मेसेंजरवर चॅटिंग करतात. पण आता नव्या अँप्लिकेशनमुळे लोक एकमेकांशी व्हिडिओ गेम खेळतानाच व्हिडिओ चॅटिंगही करु शकतील. याआधी फेसबुकने लहान मुलांसाठी मेसेंजर किडस् असे अप्लिकेशन तयार केले होते. त्यालाही अनेक देशांतून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताच्या या फिचरचा यूजर्सना निश्चितच फायदा होईल असे म्हटले जात आहे.