‘झारा’, ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ आणि ‘एच अॅण्ड एम’ हे जगभरातील तरुणाईचे लाडके ब्रॅण्ड्स भारतातही जम बसवू लागले आहेत. चला या ब्रॅण्ड्सच्या शोरूम्समध्ये एक फेरफटका मारू.
मॉलमध्ये काही अशी शोरूम असतातच, जी नेहमीच आपलं लक्ष वेधून घेतात. कधी त्यांच्या सुंदर देखाव्यांमुळे, कधी कलेक्शन किंवा कधी गर्दीमुळे. काही ब्रॅण्ड असे असतात, ज्यांना सेलचं सोयरसुतक नसतंच. कायम तिथे गर्दी असते. पण जेव्हा सेल असतो, तेव्हा काही क्षणांत अख्खं दुकान रिकामं होतं. सध्या सेल्सचा सीझन चालू आहेच. मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सनी त्यांच्या जुन्या कलेक्शन्सवर भरपूर सूट दिली आहे. पण यातही तमाम मुंबईकर फॅशनिस्टा वाट बघत असतात, ‘झाराच्या सेल’ची. यासाठी पेपरमधील जाहिराती, फेसबुक अपडेट यांच्यावर सतत लक्ष असतं. सेलच्या पहिल्याच दिवशी जवळच्या मॉलमध्ये जायचे प्लान बनतात. कित्येक जणी तर दोघींना एकच ड्रेस आवडला आणि त्यावरून भांडणं होऊन मत्री तुटायला नको म्हणून एकटय़ाच खरेदीला जातात. अशीच काहीशी गर्दी असते, ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ आणि ‘एच अॅण्ड एम’च्या सेलला. ही किमया आहे या ब्रॅण्ड्सच्या ग्लोबल प्रेझेन्सची. जगाच्या पाठीवर कुठेही जा, या ब्रॅण्ड्सचं नाव सगळ्यांनाच ठाऊक असतं. यांचं कलेक्शन अमुक एक शरीरयष्टी, देश, समाज यांच्यापर्यंत मर्यादित नसतं. मुख्य म्हणजे खिशाला परवडणारं असतं. २०१५ मध्ये ‘एच अॅण्ड एम’ भारतात सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी केलेली कमाई ही भारतातील कोणत्याही बडय़ा ब्रॅण्डच्या वार्षकि कमाईइतकी होती. यावरून तुम्हाला या ब्रॅण्ड्सचं लोकांमध्ये किती आकर्षण आहे, याची कल्पना येईल.
२०१० मध्ये ‘झारा’ आणि ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हे दोन ब्रॅण्ड भारतात दाखल झाले. त्यामानाने २०१५ मध्ये आलेल्या ‘एच अॅण्ड एम’ने थोडा उशीरच केला. पण यांच्या येण्याआधीच या तीनही ब्रॅण्ड्सचा चाहता वर्ग भारतात होता. याआधी सेलेब्रिटीजच्या बोलण्यात या ब्रॅण्ड्सचा उल्लेख यायचा. परदेशी गेलेल्या प्रत्येकाच्या शॉिपग यादीत यांचा उल्लेख असायचा. फॅशन मासिकांमध्ये यांच्याबद्दल छापून यायचं. त्यामुळे या ब्रॅण्ड्सबद्दलची उत्सुकता सगळ्यांमध्येच होती. हे तिन्ही ब्रॅण्ड्स अमेरिकन आहेत, असा बऱ्याच जणांचा समज आहे. पण फक्त ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हा अमेरिकन ब्रॅण्ड असून ‘झारा’ आणि ‘एच अॅण्ड एम’ हे स्पॅनिश आणि स्विडिश ब्रॅण्ड्स आहेत. तिन्ही परदेशी ब्रॅण्ड्स म्हणजेच वेस्टर्न कलेक्शनचे ब्रॅण्ड्स या जुजबी ओळखी पलीकडे यांच्यातील कलेक्शन्समध्ये खूप फरक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ते त्यांच्या देशांचे त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, असं म्हटलं तरीही चालेल.
तसे तिन्ही ब्रॅण्ड्स औद्योगिकीकरणातून जन्मलेले. त्यामुळे त्यांना सांस्कृतिक इतिहास वगरे नाही. युरोप फॅशन क्षेत्राची जननी. युरोपीयन ब्रॅण्ड्सची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ते काळानुसार बदलतात, पण त्यांच्या बदलातही संयम असतो. त्यामुळे झारा, एच अॅण्ड एममध्ये तुम्हाला सतत वेगवेगळ्या ट्रेण्ड्सची कलेक्शन्स पाहायला मिळतील. त्यामुळे या ब्रॅण्ड्समधून घेतलेले कपडे, अॅक्सेसरीज दोन-तीन वर्षे विनातक्रार वापरणारी अनेक उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला मिळतील.
अमेन्सिओ ऑर्टेगाने १९७५ मध्ये ‘झारा’चं पहिलं शोरूम काढलं. त्या वेळी ते बडय़ा ब्रॅण्ड्सच्या कपडय़ांच्या नकला करत आणि स्वस्तात विकत. हळूहळू त्यांनी सर्वसामान्यांना परवडू शकतील, अशी कलेक्शन्स काढायला सुरुवात केली. बडय़ा ब्रॅण्ड्सच्या तुलनेत सुरुवातीपासून ‘झारा’मध्ये मार्केटिंगवरचा खर्च शक्य तितका आवरता घेतला जातो. तसेच त्यांचं बहुतेक कलेक्शन अजूनही स्पेन आणि त्याच्या आसपासच्या गावातून तयार होतं. त्यामुळे त्यांच्या स्पर्धकांपेक्षा झाराच्या कपडय़ांच्या किंमती थोडय़ा जास्त आहेत. पण त्यामुळे कपडय़ांचा दर्जा कायम ठेवण्यास मदत होते. एका डिझायनरवर विसंबून राहण्याऐवजी झाराने त्यांची अख्खी डिझायनर्सची टीम उभारली आहे. त्यामुळे बाजारातील प्रत्येक ट्रेण्ड अचूक हेरला जातो आणि त्यानुसार त्यांच्या शोरूममधील कलेक्शन्स सतत बदलत असतात. पण त्यातही ब्लॅक ड्रेस, ब्ल्यू डेनिम असे काही निवडक क्लासिक झारा कलेक्शन्स शोरूममध्ये कायम असतात. आज त्यांची ८८ देशांमध्ये ७०१३ शोरूम्स आहेत, त्यातील १८ शोरूम्स भारतात आहेत.
वेगवेगळे ट्रेण्ड्स, लुक्स वापरून झाल्यावर स्वत:ची स्टाइल तयार करायचा विचार जेव्हा कोणाच्या मनात येतो, तेव्हा त्यांची पावलं सहज झाराकडे वळतात. या ब्रॅण्डची कलेक्शन्स सतत बदलत असली, तरी ती ट्रेण्डमधून सहसा बाहेर जात नाहीत. त्यामुळे यांच्या किमती महाग असल्या तरी दोन-तीन वर्षे कपडे तुम्ही सहज वापरू शकता. कधी कोणाच्या हातातली झाराची पिशवी बघितली आहेत? नेव्ही रंगाच्या कागदी बॅगवरची गोल्ड अक्षरं, त्यांच्यातील रॉयल लुकची जाणीव करून देतात. हीच झाराची खासियत आहे. तुमच्या फॉर्मल वेअर वॉडरोबसाठी झारा उत्तम पर्याय ठरू शकतो. यांच्या कलेक्शन्सची सुरुवात अडीच हजार रुपयांपासून होते. त्यामुळे खिशाला थोडासा चटका लागू शकतो. त्यामुळेच झाराच्या सेलची इतक्या आतुरतेने वाट पाहिली जाते.
एका बडय़ा, प्रथितयश डिझायनरचे कपडे तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानात अगदीच खिशाला परवडतील, या किमतीत मिळाले तर? ‘एच अॅण्ड एम’ने नेमकं हेच केलं. इíलन पसाँ यांनी १९४७ मध्ये स्विडन येथे हेन्स (स्विडिशमध्ये भाषेत ‘तिचा’) या वूमन्सवेअर ब्रॅण्डची स्थापना केली. १९६८ मॉरिझ विड्फोस या मेन्सवेअर ब्रॅण्डसोबत भागीदारी केल्यावर सध्या ब्रॅण्डचं नाव ‘एच अॅण्ड एम’ (हेन्स अॅण्ड मॉरिझ) जन्माला आलं. जगभरातील ६२ देशांमध्ये ३९०० हून अधिक शोरूम असलेला हा ब्रॅण्ड सध्या रिटेल क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात यांची १३ शोरूम्स आहेत.
या ब्रॅण्ड्सनी त्यांच्या वैयक्तिक कलेक्शन्ससोबत कार्ल लाग्फेर, लाविन, वर्साचे, जिमी चू अशा अनेक बडय़ा डिझायनर्सची कलेक्शन्स सर्वसामन्यांच्या आवाक्यात आणली. तसेच पॉप सिंगर मडोना, बियॉन्से यांची कलेक्शन्ससुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून दिली. दर वर्षी हे ब्रॅण्ड्स एका बडय़ा डिझायनरच्या कलेक्शनची घोषणा करतात. हे कलेक्शन फक्त ‘एच अॅण्ड एम’मध्येच उपलब्ध होतं. त्यामुळे अशा कलेक्शन्सना पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांची तोबा गर्दी मिळते. कार्ल लाग्फेर हे नाव जगातील पहिल्या क्रमांकाचा फॅशन ब्रॅण्ड ‘शनेल’ याच्याशी जोडलं गेलंय. या ब्रॅण्ड्स किंवा कार्लच्या ब्रॅण्डचं कलेक्शन म्हणजे जगभरात चच्रेचा विषय. त्यामुळे ज्या दिवशी त्याचं कलेक्शन शोरूममध्ये येणार असल्याची घोषणा ‘एच अॅण्ड एम’ने केली, त्याच्या आदल्या रात्रीपासून लोकांनी त्यांच्या शोरूमबाहेर गर्दी केली होती. कलेक्शनच्या अनावरणाच्या काही तासांतच सगळे कपडे विकले गेले.
एच अॅण्ड एम मुख्यत्वे इझी मूड युथचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे लूज गार्मेट्स, रिलॅक्स फिट लुक प्रामुख्याने पाहायला मिळेल. एरवी बाजारात सहज मिळणार नाही, असे सुंदर कोट्स, हुड्स, ट्राऊझर, जॅकेट्स इथे मिळू शकतील. यांच्या किमती साधारणपणे पंधराशे ते सहा हजारच्या घरात आहेत. अर्थात इथे तुम्हाला दहा हजाराचे कोट्स, बूट्ससुद्धा पाहायला मिळतात.
या दोघांच्या तुलनेत ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हा तसा नवा ब्रॅण्ड आहे. १९८४ मध्ये कॅलिफोíनयामध्ये डॉन वॉन श्यान आणि त्यांची पत्नी यांनी या ब्रॅण्डची सुरुवात केली. सुरुवातीला याचं नाव ‘फॅशन ट्वेंटीवन’ होतं. सध्या अमेरिकेतील बडय़ा रिटेल ब्रॅण्ड्समध्ये यांची गणना होते. जगभरात यांची ७५० हून अधिक शोरूम असून भारतात १३ शोरूम्स आहेत. मॉलच्या एका कोपऱ्यात असलेलं यांचं शोरूमही ब्राइट लेमन यलो रंगाचा बोर्ड आणि त्यावर ब्रॅण्डच्या काळ्या रंगातील नावाने चटकन लक्षात येतो. ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हा नावाप्रमाणेच तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून कलेक्शन्स बनवतो. त्यामुळे यांच्या कलेक्शन्समध्ये नेहमीच तुम्हाला ब्राइट कलर्स, फंकी डिझाइन्स, िपट्र्स, हटके पॅटर्न दिसतील. बाजारातील छोटेछोटे ट्रेण्ड हा ब्रॅण्ड टिपतो, त्यामुळे रोज काही तरी नवं हवं असणाऱ्या कॉलेजवयीन मुलांना हा ब्रॅण्ड आवडतो. हा अमेरिकन ब्रॅण्ड असल्यामुळे याच्या स्वभावातच बोल्डनेस दिसून येईल. त्यामुळे टोन्ड जीन्स, शिअर स्कर्ट, शॉर्ट टॉप, प्लंजिंग नेकलाइन असं बोल्ड कलेक्शन इथे मिळत. याच्या किमतीही इतर दोघांपेक्षा तुलनेने कमी आहेत. भारतात यांची कलेक्शन्स साधारणपणे ६०० ते पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. पण यांची कलेक्शन्सची हौसमौज असते ती बाजारात तो ट्रेण्ड असेपर्यंत. एकदा ट्रेण्ड गेला की कपडे कोपऱ्यात जातात. त्यामुळे इथून खरेदी करताना अति महाग कपडे घेणं टाळा. सेलच्या काळात इथे कपडे, अॅक्सेसरीजवर भरपूर सूट मिळते. एरवी आवाक्याबाहेरचे वाटणारे कपडेही स्वस्तात मिळून जातात. पण मुळात सेल असतात, जुना स्टॉक काढून नव्या कलेक्शन्ससाठी जागा करण्यासाठी. त्यामुळे सेलमधून घेतलेल्या कपडय़ांचा ट्रेण्ड काही महिन्यांमध्ये जाणार, हे लक्षात ठेवून खरेदी करा.
मृणाल भगत
सौजन्य – लोकप्रभा