सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून या दिवसांमध्ये रेलचेल असते ती भेटवस्तूंची. वाढदिवस, लग्नवर्षगाठ अथवा सण-उत्सवानिमित्त अनेकवेळा भेटवसतू देऊन इतरांसोबतचा आपला स्नेहभाव वृध्दिंगत करण्याचा योग येतो. भेटवस्तू म्हटलं म्हणजे त्याचे पॅकिंग करणे ओघाने आलेच. वर्षभरात आपल्यावर अनेकवेळा ‘गिफ्ट रॅप’ करण्याचे प्रसंग येतात. ‘गिफ्ट रॅप’ करणे आणि ते आकर्षक दिसेल अशाप्रकारे करणे हे अनेकांसाठी किचकट काम असते. काहीजणांसाठी तर हा कलेचाच एक प्रकार आहे.
पारंपारिक ते मॉर्डन ‘गिफ्ट रॅप’ प्रत्येकाची आपली आवड असते. तसेच ‘गिफ्ट रॅप’ करण्याची प्रत्येकाची वेगळी शैली असते. ज्यांना हस्तकला अवगत नाही अशांसाठी एकएक घडी नीट बसविणे आणि योग्यप्रकारे टोकाला टोक जुळविणे हे वेळ खाऊ काम ठरते. परंतु काही महाभाग असे आहेत जे क्षणात हे काम लिलया पार पाडतात. याचे काही व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत. एका दुकानात ‘गिफ्ट रॅप’ करण्याचे काम करणारी व्यक्ती केवळ पंधरा सेकंदात ‘गिफ्ट रॅप’ करून देतानाचा व्हिडिओ युट्युबवर व्हायरल झाला होता. ‘गिफ्ट रॅप’ करण्याचे त्याचे कसब आणि वेग पाहून अनेकजण अचंबित झाले होते.
‘गिफ्ट रॅप’चे सोपे तंत्र आत्मसात करण्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. थोड्याफार सरावाने हे तंत्र आत्मसात करणे शक्य होईल. ‘गिफ्ट रॅप’ करण्याच्या या जपानी प्रकारात भेटवस्तू कागदाच्या मध्यभागी न ठेवता, कागदाच्या कोपऱ्यातून याची बांधणी सुरू होते.
व्हिडिओ पाहा:
झटपट ‘गिफ्ट रॅप’ करण्याबरोबरच कलात्मक ‘गिफ्ट रॅप’ची शैली आत्मसात करण्याचा आणखी एक व्हिडिओ खाली शेअर केला आहे. ही शैली जरा किचकट असली, तरी ज्यांना हस्तकलेची आवड आहे त्यांना ‘गिफ्ट रॅप’ची ही अनोखी शैली आजमावून पाहायला नक्कीच आवडेल.
व्हिडिओ पाहा:
युट्युवरील व्हिडिओ पाहून स्व:ताच प्रयत्न करून पाहाण्याची आवड असणाऱ्यांना ‘गिफ्ट रॅप’चे अनेक पर्याय सापडतील.