लंडन : चालणे हा उत्तम व्यायाम आहे. दररोज नियमित चालणाऱ्यांची आरोग्याविषयीच्या विविध समस्यांपासून सुटका होते. चालणे ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे, असे डॉक्टरही सांगतात. चालताना वेग महत्त्वाचा असतो. जलदगतीने चालणाऱ्यांना दीर्घायुष्य लाभते, असे संशोधन ब्रिटनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

हल्ली हृदयविकार, रक्तदाब आणि वजन वाढणे या समस्यांमुळे चालणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. सकाळी लवकर उठून अनेक जण तासभर चालून येतात त्यानंतर आपल्या दिनक्रमाला सुरुवात करतात. रात्री जेवणानंतरही अनेक जण शतपावली करताना दिसतात. मात्र आपल्या चालण्याचा वेगही महत्त्वाचा असतो हे अनेकांना माहीत नसते. संथगतीने किंवा रमतगमत चालणे याला महत्त्व नसते. तुम्ही जलदगतीने चालत असाल तर त्याने व्यायाम होतो आणि तुमचे आयुर्मान वाढू शकते, असे संशोधन ब्रिटनमधील लिसेस्टर विद्यापीठाच्या मधुमेह संशोधन केंद्राने केले आहे.

जलदगतीने चालणाऱ्यांची टेलिमीअर्स तपासणी केली असता त्यांचे आयुर्मान जास्त असल्याचे दिसून येत आहे. टेलिमीअर्स ही एक रक्तचाचणी आहे, त्याच्या तपासणीतून व्यक्तीचे जैविक वय समजू शकते. लिसेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी ब्रिटनमधील ५० वर्षांखालील काही जणांच्या वैद्यकीय अहवालाचा अभ्यास केला, त्यानंतर हा निष्कर्ष काढला. जलदगतीने चालणाऱ्यांचे जैविक वय १२ ते १६ वर्षांनी वाढल्याचे टेलिमीअर्स चाचण्यांद्वारे दिसून आले. तसेच संथगतीने चालणाऱ्यांपेक्षा जलदगतीने चालणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका ३४ टक्क्यांनी कमी असल्याचे या संशोधनात दिसून आले. हृदयविकारासह रक्तदाब, मधुमेह तसेच मानसिक विकारही जलदगतीने चालणाऱ्यांना कमी असल्याचे या संशोधनात दिसून आले.