Best Foods for kids: वाढत्या उष्णतेमुळे मुले अनेकदा आजारी पडतात. कधी डिहायड्रेशनमुळे, तर कधी जंक फूड खाल्ल्याने त्यांचे पोट बिघडते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या उष्ण हवामानात जर तुम्हाला तुमच्या मुलाला निरोगी ठेवायचे असेल, तर त्यांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश नक्कीच करा. पालकांनी त्यांच्या मुलांना अशा गोष्टी खायला द्याव्यात, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती सुधारेल.

उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांना द्या ‘हे’ पदार्थ

दही

उन्हाळ्यात मुलांच्या आहारात दह्याचा समावेश करा. दह्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम व फॉलिक असे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे दही खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहते. शरीर थंड होते. डिहायड्रेशन कमी करण्यास मदत होते. हाडे मजबूत करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत मिळते.

नारळ पाणी

उन्हाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी नारळ पाणी द्यावे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते आणि बद्धकोष्ठता किंवा आम्लता यांसारखे त्रास होत नाहीत.

टरबूज

उन्हाळ्यात मुलांना टरबूज द्यायला हवे. त्यात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए व पोटॅशियम हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुले शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होऊन, रोगप्रतिकार शक्ती सुधारते.

द्राक्षे

द्राक्षांमुळे हाडे आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांचे सेवन केल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे अनेक प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण होते.

आंबा

मुलांना आंबा खायला आवडतोच. उन्हाळ्यात तुम्ही आंब्यापासून आइस्क्रीम शेक बनवू शकता. त्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी, पोटॅशियम व फायबर मिळते. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात.