How To Find Fresh Coconut: आता काहीच दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होईल. गणपतीच्या स्वागताला मोदकांचे ताट हे समीकरण वर्षानुवर्षे कायम आहे. राज्यानुसार मोदकांचे प्रकार बदलतात. उत्तरेकडे विशेषतः माव्याचे मोदक केले जातात तर महाराष्ट्रात खोबऱ्याच्या सारणाचे उकडीचे मोदक खूप प्रसिद्ध आहेत. या मोदकांना नैवेद्याचा मान आहे. जेव्हा तुम्ही यंदा बाप्पासाठी किंवा सहज म्हणूनही मोदक कराल तेव्हा आयत्या वेळी नारळ फोडल्यावर तो कुजलेला किंवा खराब झालेला असू नये यासाठी आपण काही सोप्या आयडीयाज पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला दुकानात गेल्यावर नारळ फोडून पाहायची सुद्धा गरज नाही फक्त खालील पाच टिप्स वापरून आपण सहज तुमचे पैसे वाचवू शकता.

न फोडता, नारळ आतून कुजलाय का कसं ओळखायचं?

१) सर्वात आधी नारळाचा आकार तपासून घ्या. गोल असलेला नारळ हा ताजा असतो. जेव्हा नारळ पक्व होतो तेव्हा त्याचा आकार लांबुडका होऊ लागतो परिणामी नारळ कुजलेला/ सडलेला असण्याची शक्यता अधिक असते.

२) नारळ हलवून पाहा. यातून तुम्हाला नारळात किती पाणी आहे याचा अंदाज घेता येतो, नारळात जर भरपूर पाणी असेल तर त्याचा आवाज येणार नाही आणि वजनही जड लागेल याउलट जर नारळ जुना असेल तर त्यात पाणी कमी असते. खोबऱ्याचा काही भाग कुजलेला असू शकतो.

३) नारळाच्या शेंडीच्या वरच्या भागाला अधिक ओलाव्यामुळे कोंब आलेले असतील तर असे नारळ घेणे टाळा.

४) वरूनच वास घेऊन पाहा. नारळाच्या टोकाला किंवा शेंडीला कुबट वास येऊ शकतो.

५) नारळाच्या आवरणावर तडा गेलेला असेल किंवा काळे डाग असतील. किंवा नारळाचे डोळे (शेंडीच्या खालील गोल डाग) हे खोलगट झाले आहेत का हे सुद्धा तपासून पाहा. जर हे डोळे अगदीच नरम झाले असतील किंवा थोडासा दाब दिल्यावर हाताला चिकट लागत असतील तर नारळ खराब आहे असे समजून जा.

हे ही वाचा<< वॉशिंग मशीनमध्ये उशी धुवून स्वच्छ करता येईल; फक्त दोन टेनिस बॉल घेऊन असा करा जुगाड

नारळ फोडल्यावर सुद्धा काहीवेळा अर्धी वाटी वापरला जातो आणि नंतर तो तसाच कुठेतरी फ्रीजच्या कानाकोपऱ्यात पडून राहतो. यापेक्षा खोबरे खवून ठेवणं कधीही उत्तम. नारळाला स्वतःचाच एक ओलावा असतो त्यामुळे खोबरं धुवून ठेवू नका.