5 Signs To Examine Breast Cancer At Home: ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमधील सर्वात सामान्य कॅन्सरचा प्रकार आहे. जेव्हा स्तनांमधील कॅन्सरच्या पेशी वाढतात आणि ट्यूमर तयार होतात तेव्हा कॅन्सर उद्भवतो. उपचार न केल्यास हा ट्यूमर संपूर्ण शरीरात पसरू शकतो आणि गंभीर ठरतो. ब्रेस्ट कॅन्सर साधारणपणे ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांमध्ये निदान होतो, तर ५०पेक्षा कमी वय असलेल्या महिलांनाही याचा त्रास होऊ शकतो. जर ब्रेस्ट कॅन्सरचे लवकर निदान झाले तर तो रोखणे अधिक सोपे होऊ शकते.
तुम्हाला हे माहीत आहे का तुम्ही घरीच ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांचा अंदाज लावू शकता. स्वत: तपासणी करू शकता.
ब्रेस्ट कॅन्सरची सहज ओळखता येणारी पाच लक्षणे
कॅन्सरचे १००हून अधिक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. दरवर्षी लाखो महिलांना याचा त्रास होतो आणि त्यांना प्राण गमवावे लागतात. २०२२मध्ये, ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगभरात ६ लाख ७० हजार जणांचा मृत्यू झाला. या कॅन्सरची भीती पुरूषांना नसली तरी जागतिक आरोग्य संघटनेनुसार पुरूषांमध्ये फक्त ०.५-१ टक्का ब्रेस्ट कॅन्सर असतो. महिला दर महिन्याला मासिक पाळीच्या एक आठवड्यानंतर स्वत:ची तपासणी करून ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करू शकतात. इंस्टाग्रामवर dr_cuterus म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर तान्या यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
१. डिस्चार्ज
जर तुमच्या स्तनाग्रांमधून स्त्राव होत असल्याचे दिसले तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या स्तनाग्रांमधून कोणताही स्त्राव (लालसर किंवा पिवळा) होणं सामान्य नाही. ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२. स्तनाच्या बदलांवर लक्ष द्या
तुमच्या स्तनांमध्ये होणारे कोणतेही बदल ब्रेस्ट कॅन्सरचा संकेतही देऊ शकतात. जर तुमच्या स्तनांचा रंग अचानक बदलला, अचानक सूज आली किंवा अचानक लालसरपणा जाणवला तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३. स्तनांचं टेक्स्चर
जर तुमच्या स्तनांचे टेक्स्चर मोठ्या प्रमाणात बदलत असेल तर तेदेखील ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. वैद्यकीय भाषेत याला peau d’orange साइन म्हणतात.
४. गाठी
जर तुम्हाला स्तनांभोवती किंवा त्या भागात कुठली नवीन गाठ जाणवत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. कोणतीही नवीन गाठ किंवा आधीचं दुखणं जे जास्त बळावत असेल किंवा स्तनाग्रांमध्ये अचानक बदल झाला तर हेदेखील ब्रेस्ट कॅन्सरचे संकेत असू शकतात.
५. ABC चेक करा
ब्रेस्ट कॅन्सरसाठी केवळ तुमच्या स्तनांवर लक्ष ठेवू नका, तर काखेत, कॉलरबोन हेदेखील लक्षपूर्वक पाहत रहा. स्तन, काख आणि कॉलरबोन हे तिन्ही सतत चेक करत रहा, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर असल्यास त्याचे निदान लवकर होण्यास मदत होऊ शकते.
