फ्लिपकार्टचा स्मार्टफोन लवकरच बाजारात

१५ नोव्हेंबरला होणार लाँच

ई-कॉमर्सच्या क्षेत्रात आघाडीवर असणारी फ्लिपकार्ट कंपनी आपला स्मार्टफोन बाजारात आणत आहे. स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचे कंपनीने आपल्या वेबसाईटवर जाहीर केले आहे. या फोनचे नाव Billion Capture + असे ठेवण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले आहे. या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा देण्यात आला आहे. याबरोबरच या स्मार्टफोनला फुल एचडी डिस्प्ले, उत्तम बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनसाठी कंपनी आपले सर्व्हिस सेंटरही उघडणार असून १२५ शहरांमध्ये एकूण १३० सर्व्हिस सेंटर असतील.

सध्या ऑनलाईन खरेदीत झालेली वाढ आणि ई-कॉमर्स कंपन्यांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद यामध्ये वाढ झाली आहे. यामध्येही मोबाईल खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे लक्षात घेऊन फ्लिपकार्टने आपला स्मार्टफोन बाजारात दाखल करण्याचे ठरविले आहे. आता हा फोन कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशाप्रकारे आपली हार्डवेअर उत्पादने बाजारात आणण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ नसून याआधीही कंपनीने आपले टॅबलेट बाजारात आणले होते. यामध्ये कंपनीने ५ टॅबलेट लाँच केले होते. त्यांची किंमत ५,९९९ रुपयांपासून १५,९९९ पर्यंत आहे. मात्र टॅबलेटची मागणी कमी झाल्याने याला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

आता कंपनी उत्पादित करत असलेल्या या ३२ जीबीच्या फोनची किंमत १०,९९९ रुपये आणि ६४ जीबीच्या फोनची किंमत १२,९९९ रुपये असेल. १५ नोव्हेंबरपासून फोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनी सध्या काळ्या आणि सोनेरी अशा दोनच रंगात या फोनचे उत्पादन करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Flipkart new production of billion capture plus smartphone